पुनर्बांधणीसह झोपडपट्टी सर्वेक्षणास विरोध करणारांविरोधात रस्त्यावर उतरणार, चौगुलेंचा नाईकांना इशारा
By नामदेव मोरे | Published: October 4, 2023 04:11 PM2023-10-04T16:11:27+5:302023-10-04T16:12:24+5:30
राज्यात सत्ता असलेल्या भाजप व शिवसेनेमध्ये नवी मुंबईमध्ये संघर्षाची ठिणगी पडली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवी मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसनासाठीचे सर्वेक्षण व जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीच्या कामात आमदार गणेश नाईक अडथळे निर्माण करत आहेत. लोकहिताच्या कामास विरोध करणारांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी दिला आहे. आमच्या संयमाचा अंत पाहिला जात असून आता आम्ही जशास तसे उत्तर देऊ असे स्पष्ट केले आहे. यामुळे राज्यात सत्ता असलेल्या भाजप व शिवसेनेमध्ये नवी मुंबईमध्ये संघर्षाची ठिणगी पडली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन करण्याची योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. चिंचपाडापासून झोपड्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. परंतु या सर्वेक्षणास आमदार गणेश नाईक यांनी विरोध करून काम बंद पाडल्याचा आरोप विजय चौगुले यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. आमदारांना त्यांचे गाव सुधारता आले नाही. आम्ही झोपडपट्टी सुधारण्यासाठी प्रयत्न करत असताना आमच्या कामात आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाशी व नेरूळमध्ये मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पुनर्बांधणीच्या कामात अडथळे निर्माण केले जात आहेत. अधिकाऱ्यांना सहकार्य न करण्यासाठी दबाव आणला जात आहे. विकासकांवरही दबाव येत असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला. नवी मुंबईमध्ये भाजपा आमदार मंदा म्हात्रे व जुन्या भाजप पदाधिकाऱ्यांशी आमचा योग्य समन्वय आहे. परंतु ऐरोलीच्या आमदारांकडून मात्र समन्वय ठेवला जात नाही. वैयक्तीक द्वेशाचे राजकारण सुरू आहे. आम्ही करत असलेल्या लोकहिताच्या कामांमध्ये अडथळे निर्माण केले जात आहेत. आम्हाला सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
झोपडपट्टी सर्वेक्षण व इमारत पुनर्बांधणीच्या कामातील अडथळे सुरूच राहिले तर संपूर्ण झोपडपट्टीमधील लाखो नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. आम्ही स्वस्त बसणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही याविषयी तक्रार करणार आहोत. यांच्याकडे सत्ता असताना त्यांना झोपडपट्टी, गावठाण विकास, जुन्या इमारतींचा प्रश्न सोडविता आला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही हे प्रश्न मार्गी लावत असताना त्या कामास विरोध होत असेल तर आम्ही एकतर्फे युतीधर्म कसा पाळायचा असा पश्नही उपस्थित केला. यावेळी किशोर पाटकर, अशोक गावडे, ममीत चौगुले, शुभम चौगुले, बहादुर बिष्ट, राजू पाटील, शीतल कचरे, आकाश मढवी, जगदीश गवते व इतर मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबईमधील झोपडपट्टी सर्वेक्षण, जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीच्या कामात अडथळे निर्माण केले जात आहेत. विकास कामांना होणारा विरोध ऐरोलीच्या आमदारांनी थांबविला नाही तर त्यांच्या विरोधात संपूर्ण झोपडपट्टीवासीय रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.
विजय चौगुले, जिल्हा प्रमुख शिवसेना
वाशीमधील जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीमध्येही अडथळे निर्माण केले जात आहेत. पुनर्बांधणीची कामे थांविण्याचा, रखडविण्याचे राजकारण केले जात आहे. काही लोक पुनर्बांधणीमध्ये हिस्सा मागत असून ही अडकाठी थांबली पाहिजे.
किशोर पाटकर, शिवसेना संपर्क प्रमुख, नवी मुंबई
नेरूळमधील इमारतीच्या पुनर्बांधणीच्या कामातही अडथळे निर्माण केले आहेत. सिडको अधिकारी, विकासक यांच्यावर दबाव आणला जात आहे. नागरिकांच्या हिताचे प्रश्न सोडविण्याऐवजी गुंता वाढविला जात आहे.
अशोक गावडे, माजी उमहापौर