नवी मुंबई : सीवूड येथील हावरे सेंच्युरियन मॉलमधील अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला. अधिकाऱ्यांना घेराव घातल्याने कारवाई न करताच अतिक्रमण विरोधी पथकाला परत जावे लागले. दोन तास सुरू असलेल्या संघर्षामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या हावरे सेंच्युरियन मॉलमधील दुकानदारांनी मार्जिनल स्पेसमध्ये वाढीव बांधकाम केले आहे. अनेक व्यावसायिकांनी दुकानांसमोर पत्र्याचे शेड टाकले आहे. पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक २८ जूनला कारवाई करण्यासाठी मॉलमध्ये आले होते. मार्जिनल स्पेस व शेडवर कारवाई करण्यात आली. अचानक झालेल्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. व्यापाऱ्यांनी कारवाई थांबविण्यास भाग पाडले. २९ जूनला व्यापाऱ्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. मॉलच्या आतील भागात आवश्यकतेप्रमाणे थोड्या अतिरिक्त जागेचा वापर केला असल्याचे सांगितले. परंतु आयुक्तांनी नियमात न बसणारे सर्व बांधकाम हटविण्याची ठाम भूमिका घेतली. यामुळे व्यापाऱ्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढण्याची तयारी दर्शवून आठ दिवसांची मुदत केली. दरम्यान, व्यापाऱ्यांनी स्थगिती मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. यानंतर अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी अचानक मॉलमधील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली. पालिकेच्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. ४६० व्यापारी व कामगार मिळून दोन हजारपेक्षा जास्त जमाव गेटवर येवून त्यांनी कारवाईला तीव्र विरोध केला. अतिक्रमण विरोधी पथकाला मॉलमध्ये प्रवेश करू दिला नाही. जवळपास दोन तास व्यापारी व अतिक्रमण विरोधी पथकामध्ये संघर्ष सुरू होता. पोलिसांनी आदेश दिल्यानंतरही व्यापाऱ्यांनी गेटवरून हटण्यास विरोध केला. महापालिका मनमानी करत आहे. आम्ही कारवाईला स्थगिती मिळावी यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने आम्हाला दुपारी स्थगिती दिली आहे. आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याविषयी माहिती देत असतानाही त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला. व्यापाऱ्यांच्या जोरदार विरोधामुळे पथकाला कारवाई न करताच परतावे लागले. याविषयी शासकीय कामात हस्तक्षेप केल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात येणार होती. परंतु रात्री ९ वाजेपर्यंत महापालिकेने कोणाच्याही विरोधात तक्रार केलेली नव्हती. महापालिकेला पहिला विरोध अतिक्रमण विरोधी पथकाने दोन महिन्यांपासून अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार मोहीम राबविली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. पालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच सातत्यपूर्ण व नि:ष्पक्षपणे कारवाई सुरू झाली होती. आयुक्तांच्या ठाम भूमिकेमुळे अद्याप कोणीही तीव्र विरोध केला नव्हता. हावरे मॉलमधील व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून कारवाई थांबविण्यास भाग पाडले. दोन महिन्यांमध्ये अतिक्रमण विरोधी पथकाला झालेला हा पहिला मोठा विरोध आहे. अधिकारी मिटिंगमध्ये व्यस्त हावरे सेंच्युरियन मॉलमध्ये कारवाई करण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विरोधी पथकाला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला. दोन हजारपेक्षा जास्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेराव घातल्यामुळे कारवाई न करताच पालिकेच्या पथकाला जावे लागले. याविषयी माहिती घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, अतिक्रमण विरोधी विभागाचे उपआयुक्त सुभाष इंगळे, सहायक आयुक्त कैलास गायकवाड यांच्याशी संपर्क साधला परंतु मिटिंगमध्ये असल्याने पालिकेची प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही. महापालिकेने २८ जूनला मॉलमधील काही दुकानांवर कारवाई केली होती. यानंतर आयुक्तांना भेटून आम्ही आठ दिवसांची मुदत मागून घेतली. अनेकांनी पावसाळी शेड व मार्जिनल स्पेसमधील पत्रे व साहित्य स्वत:हून काढून घेतले. न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर कारवाई झाल्याने विरोध केला. - भालचंद्र नलावडे, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन पाऊस व उन्हापासून रक्षण होण्यासाठी काही प्रमाणात शेड टाकले होते. परंतु त्यावरही पालिकेने कारवाई सुरू केली होती. अचानक सुरू केलेल्या कारवाईमुळे ४६० दुकानांमधील व्यापारी व कामगार रोडवर उतरले व त्यांनी अतिक्रमण विरोधी पथकाला रोखले. - भगवानराव ढाकणे, उपाध्यक्ष, व्यापारी संघटना
अतिक्रमणावरील कारवाईला विरोध
By admin | Published: July 06, 2016 2:37 AM