नवी मुंबई: सिडकोच्या माध्यमातून माथाडी कामगारांना ३५० चौरस फुटांची घरे देण्यात यावी. माह हौसिंगमध्ये कामगारांच्या कोट्यात वाढ करावी, वडाळा गृहप्रकल्पातील त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. माथाडी चळवळीतील गुंडप्रवृत्तीला आळा घालण्यासह १९ मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
माथाडी कामगारांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी कामगारांच्या प्रश्नांचे निवेदन शासनाला देण्यात येते. यावर्षीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. माथाडी कामगार चळवळीत गुन्हेगारी प्रवृत्ती घुसू लागल्या आहेत. संघटना काढून नोंदीत कामगारांवर दादागिरी केली जाते. अशा संघटनांचा बंदोबस्त करावा. कामगारांना काम करण्यापासून रोखणारांचाही बंदोबस्त करावा अशी मागणी केली.कामगारांना सिडकोच्या माध्यमातून घरे मिळावी. वडाळा गृहप्रकल्पातील अडथळे दूर करावे.माथाडी बोर्ड व सुरक्षा रक्षक कामगार सल्लागार समितीवर अनुभवी कामगार नेत्यांची नियुक्ती करावी. माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत कामगारांच्या मुलांना सामावून घ्यावे. बोर्डावर पूर्णवेळ चेअरमन व सेक्रेटरींची नेमणूक करावी. फॅक्टरीमध्ये माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी. कायद्यातील त्रुटी दूर कराव्या.रेल्वे यार्डातील समस्या सोडविण्यात याव्या. कोल्हापूर, नाशिक, पुणेमधील कामगारांचे प्रश्न ही सोडवावे अशी मागणी निवेदनातून केली.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केट मध्ये आयोजित या मेळाव्यास माथाडी नेते नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर, आमदार मंदा म्हात्रे, गणेश नाईक, शिवेंद्रसिंहराजे भोसले, कृपाशंकर सिंग व इतर मान्यवर उपस्थित होते.