रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या; राणी चांदबिबीच्या वंशजांचं आदित्य ठाकरेंना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 05:18 PM2021-03-06T17:18:04+5:302021-03-06T17:29:10+5:30
Aditya Thackrey And Anisa Shaikh : सध्याच्या घडीला विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास न करता पर्यटनाला उभारणी देण्याची गरज असल्याचे मत अनिसा शेख यांनी व्यक्त केले आहे.
पनवेल -जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहात साजरा केला जाणार आहे. मात्र सध्याच्या घडीला कोरोनामुळे सर्वच क्षेत्रातील घटकांना मोठा फटका बसला आहे. नोटबंदीनंतर अर्थव्यवस्थेला बसलेला फटका पुन्हा एकदा कोरोना अशा या दुहेरी संकटामुळे आघातामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात पर्यटनाच्या दृष्टीने विविध रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. याकरिता पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत गांभीर्याने विचार करण्याची मागणी स्पॅन महिला अॅग्रो टुरिजम संस्थेच्या अनिसा शेख यांनी केली आहे.
अनिसा शेख या अहमदनगरच्या राणी सुलतान चांदबीबी ज्यांनी महाराष्ट्रात मुघलांना प्रवेश रोखण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या वंशज आहेत. शेख यांच्या संस्थेत सुमारे 9 हजार महिला सभासद आहेत. नवी मुंबईमधील निसर्गाने संपदेने परिपूर्ण अशा खारघर हिलवर अनिसा शेख यांचा अॅग्रो टुरिझम प्रकल्प आहे. याठिकाणी वेगवगेळ्या प्रकारच्या वनस्पती, वृक्षलागवड तसेच निसर्गाच्या रक्षणासाठी शेख या प्रयत्न करीत आहेत. सध्याच्या घडीला विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास न करता पर्यटनाला उभारणी देण्याची गरज असल्याचे मत अनिसा शेख यांनी व्यक्त केले आहे.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्राच्या उभारणीसाठी राबविले जाणारे नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद आहेत. मात्र पर्यटन क्षेत्रावर देखील मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने महाराष्ट्रातील दुर्गम भागातील आदिवासी महिलांपासून शहरी भागातील सुशिक्षित महिलांनी देखील यामध्ये सहभागी करण्याची मागणी शेख यांनी केली आहे. जागतिक महिला दिन सप्ताह निमित्ताने विविध क्षेत्रातील कौतुकास्पद कामगिरी केलेल्या महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करून त्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे शेख यांनी सांगितले.