लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिका कामगार विभाग आयोजित आंतरविभागीय/खात्यांतर्गत नाट्य स्पर्धेचा दर्जा उंच असून, सातत्याने भरारी घेणारी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेतून महपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या गुणांना वाव मिळतो. महापालिकेचे अनेक कर्मचारी / कामगार या स्पर्धेतून कलाकार, नाटककार, दिग्दर्शक झाले आहेत. महापालिकेने अशा स्पर्धेत भाग घेणाऱ्या नाट्य, कलावंत मंडळांकरिता योग्य आर्थिक तरतूद करावी, असे निर्देश मुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी प्रशासनाला दिले.विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात महानगरपालिका कामगार विभाग आयोजित ४६वी आंतरविभागीय / खात्यांतर्गत नाट्यस्पर्धा २०१६-१७ चा पारितोषिक वितरण समारंभ हेमांगी वरळीकर यांच्या हस्ते पार पडला. या वेळी त्या बोलत होत्या.हेमांगी वरळीकर म्हणाल्या की, ‘महापालिकेचे कामगार कामकाज, कर्तव्य सांभाळून आपली कला जोपासत आहेत. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नाट्यस्पर्धांपेक्षा महापालिकेतर्फे आयोजित ही स्पर्धा निश्चितच दर्जेदार आहे. कर्मचारी कलावंतांनी घेतलेली मेहनत दाद द्यावी, अशी आहे. कर्मचाऱ्यांची ही कला अधिक कसदार होऊ शकते. या स्पर्धेकरिता केलेली तरतूद त्या मानाने कमी आहे, ती योग्य प्रमाणात करावी.दरम्यान, नाट्यस्पर्धेत सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून घनकचरा व्यवस्थापन विभागाचे ‘काटकोन त्रिकोणास’ प्रथम क्रमांक, द्वितीय सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून देवनार पशुवधगृहाचे ‘अम्मी’, तर तृतीय सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून ‘माणसांपरीस मेंढरी बरी’ यांना पारितोषिक प्राप्त झाले. उत्तेजनार्थ नाटकांत प्रथम ‘अ विभागीय कार्यालयांचे’, ‘जा खेळायला पळ’, तर द्वितीय नाटक म्हणून प्रमुख लेखापाल (वित्त) विभागाचे ‘हे नटेश्वरा’ हे घोषित करण्यात आले.
नाट्य स्पर्धेचा दर्जा पाहून योग्य ते आर्थिक साहाय्य करावे
By admin | Published: May 15, 2017 12:51 AM