नवी मुंबई : प्रांतवादाचे राजकारण करून काही राजकीय पक्षांनी उत्तर भारतीय नागरिकांना यापूर्वी मारहाण केली. त्यांचे ठेले तोडले. अशाप्रकारे राजकारण करणाºया पक्षांचा या निवडणुकीमध्ये अंत करणार असल्याची टीका भाजप खासदार मनोज तिवारी यांनी केली. नाव न घेता त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
ऐरोली सेक्टर १७ मध्ये भाजपच्या वतीने हिंदी भाषकांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये हिंदी भाषक कलाकार खासदार मनोज तिवारी यांनी प्रांतवादाचे राजकारण करणाऱ्यांवर टीका केली. यापूर्वी मुंबई, ठाणे व नवी मुंबईमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले करण्यात आले. त्यांना मारहाण करण्यात आली. प्रांतवादाचे राजकारण करणाºया पक्षांनी उत्तर भारतीय नागरिकांचे ठेले तोडले, त्यांच्या गाड्यांचे नुकसान केले. तेव्हा मी फक्त कलाकार होतो. त्या वेळी रोडवर उतरून या हल्ल्यांचा विरोध केला होता. त्या अडचणीच्या काळामध्ये नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांनी सहकार्य केले होते. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या काही नेत्यांनीही मदत केली होती, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.
प्रांतवादाचे राजकारण करणाºया पक्षांचा या निवडणुकीमध्ये अंत केला जाईल, अशी टीकाही त्यांनी केली. या वेळी ऐरोली मतदारसंघाचे उमेदवार माजी मंत्री गणेश नाईक, भाजपचे नगरसेवक अनंत सुतार व इतर मान्यवर उपस्थित होते.
पाहा व्हिडीओ