महाराष्ट्र भवनासाठी तरतूद, वाशीत भूखंड आरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 12:30 AM2020-03-07T00:30:40+5:302020-03-07T00:30:49+5:30

नवी मुंबईमध्ये सिडकोने सर्वच राज्यांचे भवन उभारण्यासाठी भूखंड आरक्षित केले आहेत. वाशी रेल्वे स्टेशन व महामार्गाच्या मध्यभागी हे भूखंड उपलब्ध करून दिले आहेत.

Provision for Maharashtra Bhavan, Vashi plot reserved | महाराष्ट्र भवनासाठी तरतूद, वाशीत भूखंड आरक्षित

महाराष्ट्र भवनासाठी तरतूद, वाशीत भूखंड आरक्षित

Next

नवी मुंबई : सिडकोने वाशीमध्ये आरक्षित केलेल्या भूखंडावर महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये याविषयी घोषणा केली असल्यामुळे लोकप्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले असून नागरिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
नवी मुंबईमध्ये सिडकोने सर्वच राज्यांचे भवन उभारण्यासाठी भूखंड आरक्षित केले आहेत. वाशी रेल्वे स्टेशन व महामार्गाच्या मध्यभागी हे भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. आतापर्यंत आसाम, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशासह इतर राज्यांच्या भवनाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु महाराष्ट्र भवन उभारण्यास विलंब होत होता. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व इतर संघटनांनीही यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल घेऊन राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये वाशीमध्ये भव्य महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे नवी मुंबईकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार मंदा म्हात्रे यांनी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. सिडकोने ८ हजार चौरस मीटरचा भूखंड आरक्षित ठेवला आहे. यावर भवन उभारण्याचे काम लवकर सुरू व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री शशिकांत शिंदे, शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी भूखंडाची पाहणी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही यासाठी पाठपुरावा केला होता.
>फुटबॉल विश्वचषकासाठी तरतूद
आंतरराष्ट्रीय फुटबॉल फेडरेशन व भारतीय फुटबॉल फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नोव्हेंबर २०२० मध्ये ज्युनीअर विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे काही सामने नवी मुंबईमध्ये होणार असून त्या स्पर्धेसाठीही शासन अनुदान उपलब्ध करून देणार आहे. यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
>सिडकोने वाशीमध्ये ८ हजार चौरस मीटरचा भूखंड महाराष्ट्र भवनसाठी आरक्षित ठेवला आहे. या भूखंडावर भवन उभे राहावे यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात आली आहे.
- मंदा म्हात्रे,
आमदार
बेलापूर मतदारसंघ

Web Title: Provision for Maharashtra Bhavan, Vashi plot reserved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.