नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर ७ येथे गुरुवारी एका मनोरुग्णाने धुडगूस घातल्याने त्याला आवरताना पोलीस व अग्निशमन दलाची दमछाक झाली. अखेर दोन-अडीच तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला पकडून त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार कोपरखैरणे सेक्टर ७ येथील मंजुश्री सोसायटीच्या डकमध्ये रात्री एक मनोरुग्ण चढला. तो मोठमोठ्याने गाणे गाऊ लागला, त्यामुळे सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने सकाळी चौकशी केली असता इमारतीच्या डकमध्ये निर्वस्त्र अवस्थेतील एक ४० वर्षीय मनोरुग्ण इसम आढळून आला. सोसायटीतील रहिवाशांनी त्याला बाहेर येण्यास सांगितले; परंतु त्याने खाली येण्यास नकार दिल्याने अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने या इसमाला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. त्याला कपडे व खायला दिले; परंतु त्याने ते भिरकावून लावले. सलग दोन ते अडीच तास चाललेल्या या नाट्यानंतर अग्निशम दलाच्या जवानांनी लिफ्ट असलेले वाहन मागविले. त्याद्वारे काही जवान त्या डकमध्ये उतरून त्या मनोरुग्णाला खाली आणले. चौकशीनंतर संध्याकाळी त्याला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.