पीटीचे सर शिकवतात इतिहास, भूगोल! महापालिका शाळांतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 07:09 AM2017-11-27T07:09:48+5:302017-11-27T07:10:22+5:30
शहरातून चांगले खेळाडू घडविण्यासाठी दररोज मैदानी खेळ खेळणे तितकेच गरजेचे आहे. मात्र, नवी मुंबईतील परिस्थिती काहीशी वेगळी झाली असून शाळेतील पीटीचा तास हा शिल्लक राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण
- प्राची सोनवणे
नवी मुंबई : शहरातून चांगले खेळाडू घडविण्यासाठी दररोज मैदानी खेळ खेळणे तितकेच गरजेचे आहे. मात्र, नवी मुंबईतील परिस्थिती काहीशी वेगळी झाली असून शाळेतील पीटीचा तास हा शिल्लक राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वापरला जात आहे. क्रीडा शिक्षकांना खेळाच्या तासाला शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट विषय शिकविण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खासगी शाळा तसेच महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांना वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी भूगोल, इतिहास, विज्ञान अशा विषय शिकवावे लागतात. त्यामुळे वेळापत्रकातील पीटीचा तास असूनही प्रत्यक्षात तो होत नसून त्याची जागा इतर विषयांनी घेतली आहे.
असे असतानाही शहरातील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उच्च पातळीच्या कामगिरी बजाविण्याची अपेक्षा सहजपणे व्यक्त केली जात आहे. शहरातील काही ठिकाणी तर पीटीचा तास म्हणजे तासभर मुलांना मोकळे सोडणे, त्यांच्याकडून शाळा स्वच्छतेची कामे करून घेणे, असा प्रकार बहुतेक शाळांत सुरू आहे. विद्यार्थ्यांचे क्रीडा कौशल्य बहरत जावे, याकरिता असलेल्या या पीटीच्या तासाला विद्यार्थ्यांना मैदानात सोडले जातच नसल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या काही वर्षांपासून शाळांमधील पूर्ण वेतनावर क्रीडा शिक्षकांची नेमणूकच बंद झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळविणारे बहुतांश विद्यार्थी हे महापालिका शाळांमधील असूनही महापालिका शाळांमध्ये याकडे गांभीर्याने लक्ष घातले जात नाही.
विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा, मैदानी खेळातून एक चांगले व्यक्तिमत्त्व घडवावे या बाबींकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात असून विद्यार्थ्यांना मैदानांपासून लांब ठेवले जात आहे. शालेय पातळीवरच विद्यार्थ्यांत खेळाबद्दल, शारीरिक शिक्षणाबद्दल जागरूकता व्हावी. चांगले खेळाडू घडण्याची सुरुवात शालेय स्तरावरच सुरू होण्यासाठी क्रीडा विभाग आहे. प्रत्येक वर्गाला त्यासाठी पीटीचा तास आहे. पूर्ण पगारावर क्रीडा शिक्षकांची नेमणूक न करता तुटपुंजा मानधनात या शिक्षकांवर उत्तम खेळाडू घडविण्याची जबाबदारी सोपविण्यात येते. अशा अवस्थेत हे नामधारी शिक्षक काय ताकदीचे विद्यार्थी घडवणार.
शाळा तिथे मैदान असलेच पाहिजे, असा शाळा मंजूर करताना नियम आहे; पण तरीदेखील काही शाळांना मैदानच नाही, अशी
स्थिती आहे. त्यामुळे तेथे खेळाडू घडतील, ही अपेक्षाच करणे चुकीचे ठरले आहे.
रोज विद्यार्थ्यांकडून एकच तक्रार
‘आमचा खेळाचा तास रद्द करून इतर विषयाचा अभ्यास घेतला’
रोज विद्यार्थ्यांकडून एकच तक्रार ऐकायला मिळते की, आमचा खेळाचा तास रद्द करून इतर विषयाचा अभ्यास घेतला, अशी तक्रार पालकांनी केली आहे. वेळापत्रकानुसार इतर विषयांना बरोबरीने महत्त्व दिले जात असताना पीटीचा तास क सा टाळला जातो, अशी विचारणा पालकांनी केली आहे. परीक्षेच्या कालावधीत तर महिनाभर विद्यार्थ्यांना मैदानात सोडलेच जात नसल्याची नाराजी पालकांनी व्यक्त केली.
तासाला ५० ते १०० रु पये व महिन्याला एकूण रुपयांपेक्षा जास्त मानधन नाही, अशा तत्त्वावर शिक्षक नेमले गेले आहेत. शाळेत पूर्ण पगारी क्रीडा शिक्षक नाही. अनेक शाळांमध्ये मैदान नाही. अशा स्थितीत क्र ीडा शिक्षक खेळाडूंची नवी पिढी कशी घडवतील. या परिस्थितीत क्र ीडा शिक्षक पदरमोड करून खेळ टिकवण्यासाठी जरूर धडपड करत आहेत; पण हा कायमस्वरूपी मार्ग नाही. त्यासाठी शासनानेच खेळाला प्राधान्य द्यायला हवे आणि क्र ीडा, कला शिक्षकांनाही मानाचे स्थान मिळाले पाहिजे. या क्रीडा शिक्षकांकडून मोठ्या अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे.
२८ शाळांना मैदानेच नाहीत
महापालिकेच्या २८ शाळांना तर मैदानेच नाहीत, अशा शाळांना इतर महापालिका शाळेतील मैदाने वापरण्यास सांगितले जाते. शासनाच्या नियमानुसार पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांकरिता आठवड्यातील प्रत्येकी चार तास आरोग्य व शारीरिक शिक्षण, तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांकरिता प्रत्येकी तीन तास, पाचवीच्या विद्यार्थ्यांना तीन तास, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार तास असे नेमून देण्यात आले आहेत.
शासनाच्या वेळापत्रकानुसार पीटीचा तास हा प्रत्येक वर्गासाठी ठरवून दिलेला आहे. ज्या शाळेला मैदाने नाहीत, अशा शाळेची मुले जवळपासच्या शाळेतील मैदानाचा वापर करतात. प्रत्येक वेळी प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच खेळ खेळण्याची आवश्यकता नसून विद्यार्थ्यांना त्यांच्या मर्जीनुसार खेळण्याचे स्वातंत्र्यही दिले जाते.
- संदीप संगवे, शिक्षणाधिकारी,
नवी मुंबई महानगरपालिका