नवी मुंबई : स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने मंगळवारी सीवूडमध्ये फ्लॅश मॉबचे आयोजन केले होते. देशभक्तीपर व स्वच्छतेचा संदेश देणारी गीत व नृत्याच्या माध्यमातून स्वच्छतेच्या चळवळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
वाशी व सीवूडमधील मॉलमध्ये आयोजित फ्लॅश मॉबला नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला. "निश्चय केला नंबर पहिला नवी मुंबईचा, क्लिनर टुडे बेटर टुमारो हाच ध्यास माझा" या शब्दांच्या तालावरही युवक, युवतींनी नृत्य सादर केले. नवी मुंबईला यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये देशात पहिला नंबर मिळवून द्यायचाच, हा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला. मागील वर्षी देशात तिसरा असलेला क्रमांक यावर्षी पहिला येईल, असा विश्वास जागवणारी ही फ्लॅश मॉबची संकल्पना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वाशीमधील इनॉर्बिट मॉलमध्ये सायं. ६ वाजता व सीवूड मधील ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये रात्री ८ वाजता राबविण्यात आली.
स्वच्छ सर्वेक्षणाच्या जनजागृतीसाठी महानगरपालिका विविध माध्यमांचा उपयोग करीत असून चौकाचौकात, वर्दळीच्या ठिकाणी होणा-या स्वच्छताविषयक जनजागृतीपर पथनाट्य, नृत्यनाट्य यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीने दोन्ही मॉलमध्ये अचानक सादर झालेला फ्लॅश मॉबसारख्या अभिनव उपक्रमाने नागरिकांचे लक्ष वेधून घेत समूहाला आकर्षितही केले. गीतनृत्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश प्रसारित करणा-या या उपक्रमाला नागरिकांची मोठ्या प्रमाणावर पसंती लाभली.