नवी मुंबई : मानवी तस्करीविषयी जनजागृती करण्यासाठी ओॲसिस इंडिया सामाजिक संस्थेने मुक्ती बाइक चॅलेंज यात्रेचे आयोजन केले होते. मंगळुरू ते मुंबई असा दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. शुक्रवारी ही यात्रा नवी मुंबईत दाखल झाली असून शनिवारी मुंबईमध्ये याचा समारोप होणार आहे.
देशामध्ये मानवी तस्करीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. प्रत्येक आठ मिनिटांमध्ये एक मुलगा किंवा मुलगी हरवते. यापैकी अनेकांचा पत्ता लागत नाही. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ओॲसिस इंडियाच्या माध्यमातून २०१७ पासून ही जनजागृती केली जात आहे.यावर्षीही मुक्ती बाइक चॅलेंज यात्रेत चार भारतीय व ४ विदेशी असे ८ रायडर्स सहभागी झाले होते. २८ ऑक्टोबरला बंगळुरू येथून सुरुवात झाली. हसन, मंगलोर, उड्डपी, कुमटा, बेळगाव, मीरज पुणे असा प्रवास करून शुक्रवारी नवी मुंबईमध्ये दाखल झाली. शनिवारी वायएमसीए इंटरनॅशनल हाउस येथे याचा समारोप होणार आहे.
या यात्रेदरम्यान शाळा, महाविद्यालये व इतर ठिकाणी पथनाट्य व इतर मार्गाने मानवी तस्करी रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, काय खबरदारी घ्यावी, महिला, मुलांचे संरक्षण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. या यात्रेच्या माध्यमातून संकलित झालेला निधी अत्याचाराला बळी पडलेल्या लोकांना सक्षम करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची माहितीही विश्वास उदगीर यांनी दिली.
मानवी तस्करीविषयी जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करता आली याचे समाधान आहे.- रिटा गटब्रलेत, जर्मनी
आतापर्यंत सलग पाच वेळा मुक्ती बाइक चॅलेंजमध्ये सहभाग घेतला आहे. अत्यंत संवेदनशील विषयावर या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.- विजय अंपय्या