नवी मुंबई : वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जादूटोणाविरोधी कायद्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी बेलापूरमधील विद्याप्रसारक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये मंगळवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती, प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती अंतर्गत शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांना जादूटोणाविरोधी कायद्यातील कलमांविषयी सखोल माहिती देण्यात आली. अंधश्रद्धेस बळी पडण्यापेक्षा वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे प्रगती करण्याविषयीचा कानमंत्र विद्यार्थ्यांना देण्यात आला. आपल्या आजूबाजूच्या अंधश्रद्धांविरोधात विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे आवाज उठवावा, कसा विरोध करावा यासंबंधी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते रवींद्र खानविलकर, रोहिदास सरतापे यांनी विद्यार्थ्यांना जादूटोणा कायद्याविषयी संपूर्ण माहिती दिली. कोणत्या प्रकारची शिक्षा केली जाते आणि किती दंड आकारला जातो हे सांगितले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्राची जोशी, प्राध्यापक एस.डी. सोनवणे, शहाजी किर्दत, दीपक दिवेकर, ललित भोईर राहुल पवार, शाळेचे शिक्षक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जनजागृती
By admin | Published: July 23, 2015 3:47 AM