नवी मुंबई : रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांमध्येही जनजागृती महत्त्वाची असल्याची भावना आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. त्याकरिता नागरिकांनी वाहतुकीचे नियम प्रत्यक्षात अमलात आणण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. वाशी येथे सारथी सुरक्षा यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल रोड सेफ्टी उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या उपस्थित होत्या.
वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सारथी सुरक्षाचे प्रवक्ता विनय मोरे यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. या वेळी प्रत्येक व्यक्तीने आपआपली जबाबदारी ओळखून वाहन चालवताना अथवा पायी चालताना खबरदारी घेतल्यास बऱ्याच प्रमाणात अपघातांना आळा बसेल, अशी भावना आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली. वाहन अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार तसेच वाहतूक पोलीस सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याकरिता अनेक उपक्रम, अभियाने राबवली जात आहेत; परंतु प्रत्यक्षात नागरिकांनी त्यातून बोध घेतला तरच ही अभियाने यशस्वी ठरतील असेही त्या म्हणाल्या. सदर कार्यक्रमास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले, महाविद्यालयाचे प्राचार्य शिवणकर, प्रसिद्ध जादूगार सतीश देशमुख, किमया देशमुख, प्रसन्ना कुमार, विनय मोरे आदी उपस्थित होते.