गणेशोत्सवामधून महिला सुरक्षेविषयी जनजागृती
By admin | Published: September 15, 2016 02:36 AM2016-09-15T02:36:12+5:302016-09-15T02:36:12+5:30
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यासाठी लोकमत प्रस्तुत आपले बाप्पा व सखी मंचने महिला सुरक्षेविषयी जनजागृती मोहीम राबविली.
नवी मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यासाठी लोकमत प्रस्तुत आपले बाप्पा व सखी मंचने महिला सुरक्षेविषयी जनजागृती मोहीम राबविली. यानिमित्ताने सानपाडा व जुईनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिबिरांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महिलांनी सुरक्षेसाठी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.
सानपाडाचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने १२ सप्टेंबरला विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सहाय्यक पोलीस आयुक्त धनराज दायमा यांनी यावेळी महिला सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले. महिलांनी स्वत:ची सुरक्षा स्वत: करण्यासाठी सक्षम झाले पाहिजे. सोनसाखळी चोरीच्या घटना अनेक वेळा घडत असतात. या घटना होवू नयेत यासाठी दक्षता घेतली पाहिजे. घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये अनेक वेळा महिलाच महिलांच्या छळास कारणीभूत असतात. हे प्रकार थांबविले पाहिजेत असे त्यांनी स्पष्ट केले. कोणतीही घटना घडल्यास तत्काळ नियंत्रण कक्षास माहिती द्यावी. महिलांच्या मदतीसाठी प्रतिसाद अॅप्स असून त्याचाही उपयोग करावा, असे आवाहन केले. यावेळी सानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा होडगे, मंडळाचे अध्यक्ष भाऊ भापकर, कार्याध्यक्ष अजित सावंत, गणपत वाफारे, महेश बनकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
जुईनगर सेक्टर २५ मधील भारत सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये भारत संस्कृती महिला मंडळानेही जनजागृती उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नेरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकराव पोळ यांनी मार्गदर्शन केले. एटीएममधून पैसे काढताना खबरदारी घ्यावी. पीन नंबर टाकताना दुसरा हात बटनांच्या वरती धरावा. पैसे काढताना दुसरी व्यक्ती एटीएम सेंटरमध्ये येवू देवू नये अशा प्रकारच्या सूचना केल्या. मोबाइल, सोशल मीडियामधून महिलांविषयी चुकीचे संदेश पाठविण्याचे प्रकार घडत असतात. अनेक वेळा शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेड काढली जाते किंवा पाठलाग केला जातो. अशा प्रकारची कोणतीही गोष्ट निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी लोकमत सखी मंचच्या वतीने मोदक स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये भाग्यश्री जाधव, रून्नू पाणिग्रही, नीलम वळवईकर यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आला. परीक्षक म्हणून स्वाती वाघ यांनी काम पाहिले. कार्यक्रमास भारत तरुण मित्र मंडळाचे सचिव रणजित उल्मेक, सोसायटीचे खजिनदार प्रवीण होवाळ, भारत सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा प्रीती गोळपकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.