नवी मुंबई : शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने एका खासगी संस्थेच्या सहकार्याने जनसायकल प्रणाली सुरू केली आहे. सायकलीचा वापर करून झाल्यावर या सायकली पुन्हा जवळील स्टॅण्डवर ठेवणे बंधनकारक असताना सायकली चक्क सोसायट्यांच्या पार्किंगच्या आवारात ठेवल्या जात आहेत. वापरानंतर सायकली आणि इलेक्ट्रिकल बाइक स्टॅण्ड व्यतिरिक्त कुठेही सोडण्याच्या घटना वाढत येत असल्याचे दिसून येत आहे. अनेक नागरिकांकडून योजनेचा गैरवापर केला जात असून नियमांचे उल्लंघन केले जात आहे.
नवी मुंबई हे पर्यावरणशील शहर म्हणून विकसित व्हावे, तसेच कमी अंतरासाठी खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा, यासाठी सायकलसारखे प्रदूषणमुक्त वाहन वापराला प्राधान्य देणारी जनसायकल प्रणाली महापालिकेने १ नोव्हेंबर २०१८ रोजी सुरू केली.या प्रणालीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विविध कामांसाठी शहरातून नागरिकांनी पनवेल, उरण, ठाणे, सीएसएमटी आदी ठिकाणी ये-जा करण्यासाठी सायकलींचा वापर केला आहे. योजनेला नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद यामुळे ४ जुलै २०१९ रोजी शहरात इलेक्ट्रिकल बाइक हा उपक्रमही सुरू करण्यात आला आहे. इलेक्ट्रिकल बाइक या प्रणालीला पाच महिन्यांतही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
सायकल आणि ई-बाइकसाठी शहरात ठिकठिकाणी स्टॅण्ड बनविण्यात आले असून वापर झाल्यावर पुन्हा जवळील स्टॅण्डवर उभ्या करायच्या आहेत; परंतु अनेक वेळा सायकल आणि बाइक स्टॅण्ड व्यतिरिक्त कोठेही सोडल्या जात आहेत, त्यामुळे इतर नागरिकांना स्टॅण्डवर सायकल आणि ई-बाइक उपलब्ध होत नाहीत.
इलेक्ट्रिकल बाइक ही एका व्यक्तीसाठी बनविण्यात आली असताना एकापेक्षा जास्त मुले या बाइकवरून प्रवास करीत आहेत. वयाच्या १६ वर्षांखालील लहान मुलांनी इलेक्ट्रिकल बाइकचा वापर करणे बंदी असताना १६ वर्षांपेक्षा लहान मुलेदेखील इलेक्ट्रिकल बाइक चालवीत आहेत, यामुळे त्या मुलांच्या संरक्षणाला धोका असताना नियमांचे उल्लंघन केले जात आहे.