मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांचे मेगाहाल
By नामदेव मोरे | Published: July 8, 2024 05:49 PM2024-07-08T17:49:07+5:302024-07-08T17:49:57+5:30
रेल्वे स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी : प्रवाशांना बेस्टसह एनएमएमटीचा आधार: हजारो प्रवाशांची अर्ध्यातूनच घरवापसी
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे हार्बर मार्गावरील लोकसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे मेगा हाल झाले. रेल्वेसेवा बंद असल्यामुळे बेस्ट व एनएमएमटी बस थांब्यावरही प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. हजारो प्रवाशांना कार्यालयात पोहचताच आले नाही. अनेकांनी अर्ध्या रस्त्यातून घरवापसी करणे पसंत केले. बसने प्रवास करणारांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.
हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान वाहतूक सुरळीत होती. परंतु वाशीवरून मुंबईकडे जाणारी सेवा सकाळी बंद करण्यात आली होती. यामुळे वाशी रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. लोकलसुरळीत होत नसल्यामुळे प्रवाशांनी महामार्गावर जावून एसटी, बेस्ट व एनएमएमटी बसेसचा आधार घेतला. सर्व बसेसमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. मुंबईतील सर्व मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी असल्यामुळे बसेस वेळेत पोहचत नव्हत्या. अनेक प्रवाशांनी अर्ध्या रस्त्यामधूनच घरी जाणे पसंत केले.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या ३७० बसेस नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबीवली या मार्गावर धावत होत्या. मुंबईत जास्त बसेस पाठविण्याचे नियोजन केले होते. पण वाहतूक कोंडीमुळे जास्त बसेस पाठविणे शक्य झाले नाही. नवी मुंबई महानगरपालिका उपक्रमाची बस सकाळी साडेनऊ वाजता मंत्रालयाबाहेर पाेहचते. परंतु सोमवारी एक ते दिड तास उशीरा बसेस पोहचत असल्याची माहिती एनएमएमटी प्रशासनाने दिली.
विरारवरून सानपाडामध्ये कार्यालयात येण्यासाठी सकाळीच निघालो होतो. बांद्रापर्यंत पोहचलो पण तेथून पुढे येण्यासाठी लोकल मिळाली नाही. यामुळे पुन्हा घरी जाणे पसंत केले. - चंद्रकांत दळवी, विरार
वाशीपर्यंत लोकल सुरू होती. तेथून मुंबईत जाण्यासाठी लोकल मिळत नव्हती. बसची सुविधाही विस्कळीत झाली होती. यामुळे कार्यालयात पोहचता आले नाही. - सुधाकर माने, नेरूळ
कल्याणवरून नवी मुंबईत येतानाही तारेवरची कसरत करावी लागली. लोकल वेळेत धावत नव्हत्या. प्रचंड गर्दी होती. - विजय देशमुख,कल्याण
एनएनएमटीच्या ३७० बसेस विविध मार्गांवर धावत होत्या. मुंबईत वाहतूक कोंडीमुळे बसेस वेळेवर पोहचत नव्हत्या. प्रवाशांना जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी प्रयत्न केला. - योगेश कडूसकर, व्यवस्थापक एनएमएमटी