सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने होणार साजरा, दहाऐवजी दीड दिवसांचाच उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 01:53 AM2020-08-06T01:53:20+5:302020-08-06T01:53:33+5:30

दहाऐवजी दीड दिवसांचाच उत्सव : आरोग्य उपक्रमांवर करणार खर्च, गरजूंना देणार मदतीचा हात

Public Ganeshotsav will be celebrated simply | सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने होणार साजरा, दहाऐवजी दीड दिवसांचाच उत्सव

सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने होणार साजरा, दहाऐवजी दीड दिवसांचाच उत्सव

Next

योगेश पिंगळे।

नवी मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या वर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दहाऐवजी दीड दिवसांचाच उत्सव साजरा केला जाणार आहे. उत्सवावर होणारा खर्च हा आरोग्यविषयक कार्यक्रमांवर खर्च केला जाणार असून, गरजूंना मदतीचा हात देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

कोरोना संकटामुळे गणेशोत्सवावरही आता काही निर्बंध आले आहेत. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना तो राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांना गेल्या अनेक वर्षांची परंपरा असून, त्यांच्यामार्फत विविध आरोग्यविषयक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, गणेशोत्सव काळात भाविकांची गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने बहुतांशी मंडळांनी या वर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दहा दिवसांऐवजी दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करून, या दीड दिवसात कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम साजरे न करता, आरोग्यविषयक आणि स्वच्छतेचे प्रबोधन करणारे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. विशेष म्हणजे, या वर्षी कोणत्याही प्रकारची वर्गणी काढण्यात येणार नाही.

कोरोनामुळे घरगुती गणपतीही दीड दिवसांचे

च्कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सावर्जनिक मंडळांनी यंदा दहा दिवसांचा गणेशोत्सव दीड दिवस दिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक नागरिकांनी घरगुती गणेशोत्सवही दीड दिवसाचा करण्याचा निर्णय घेतला आहे.

च्महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अनिकेत रमाकांत म्हात्रे यांनीही यंदा १0 दिवसांचा घरगुती गणेशोत्सव साजरा न करता, दीड दिवसांचा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, पुढील दहा दिवस गरजूंना अन्नधान्य, शिजवलेले अन्नवाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंडप, सजावट नाही : मोठे मंडप, सजावट, आगमन, विसर्जन मिरवणूक आदी सर्व बाबी टाळण्यात येणार आहेत. शासनाने सूचित केलेल्या निर्देशांचे पालन करून, मूर्तीची उंची, सामाजिक अंतर आदी नियमांचे पालन केले जाणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची मूर्ती बसविण्यात येणार आहे. प्रदूषण टाळण्यासाठी या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात केले जाणार असून, मंडळाच्या माध्यमातून गरजूंना आवश्यक साहित्यांचे वाटप करून मदत करण्यात येणार आहे.

कोरोना संकटामुळे या वर्षी साधेपणाने आणि दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यविषयक उपक्रम राबविले जाणार आहेत. लॉकडाऊन काळात गरजूंना अन्नधान्य आणि साहित्याचे वाटप केले आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीला १ लाख रुपये दिले आहेत. आदिवासी भागातील पाच विद्यार्थ्यांचा बारावीनंतरच्या शिक्षणाचा खर्च केला जाणार आहे.
- अंकुश वैती, अध्यक्ष,
शिवछाया मित्रमंडळ, तुर्भे

या वर्षी सध्या पद्धतीने दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जाणार असून, दरवर्षीप्रमाणे मंडप, सजावट केली जाणार नाही. पर्यावरणपूरक मूर्ती बसवली जाणार आहे. कोणत्याही प्रकारची वर्गणी, देणगी घेण्यात येणार नाही. या वर्षी गणेशाचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक होणार नाही.
- संपत शेवाळे, अध्यक्ष,
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर १७ वाशी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव दीड दिवसाचा साजरा करण्याचा निर्णय मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे मोठा मंडपही बांधण्यात येणार नाही. भाविकांकडून सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन व्हावे, यासाठी मार्किंग केले जाणार आहे.
- सुरेंद्र शिंदे, अध्यक्ष,
गणेशोत्सव मंडळ, सेक्टर १६,वाशी

 

Web Title: Public Ganeshotsav will be celebrated simply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.