नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णसेवा पुरविण्यात येणारी अडचण महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दूर केली असून, रुग्णालय सक्षमतेने पूर्ववत कार्यरत झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
वाशी येथे नवी मुंबई महापालिकेचे एकमेव सार्वजनिक रुग्णालय आहे. या रु ग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमरतेमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या, तसेच आरोग्यसेवा देताना विविध अडचणी येत होत्या या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पालिका आयुक्तांनी विशेष लक्ष देत तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य विभागाला निर्देश दिले होते. त्यास अनुसरून आवश्यक वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून घेण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णालय सक्षमतेने पूर्ववत कार्यरत झाले आहे. रु ग्णालयात सध्या दाखल एकूण १६४ रुग्णांवर आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. मंगळवार, ३० एप्रिल रोजी रुग्णालयात ६५ रुग्ण दाखल झाले असून, अतिदक्षता विभागात ९ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. रुग्णालयातील वैद्यकीय सेवेतील अडचणी दूर करून रुग्णसेवा पूर्ववत सुरू करण्यात आल्या असून सर्वसामान्य नागरिक वैद्यकीय उपचारांशिवाय वंचित राहू नयेत, याबाबतच्या सूचना आयुक्तांच्या माध्यमातून संबंधितांना देण्यात आल्या आहेत.