नवी मुंबई : भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या ‘अमृत काळ’ आणि ‘इंडो ग्लोब टायज : अ न्यू सिम्फनी इन प्ले’ या दोन दैनंदिनींचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी प्रकाशन करण्यात आले. ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी श्रीगणेशाचे दर्शन घेतले. याप्रसंगी संदीप नाईक यांच्यासह माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक आणि संकल्प नाईक उपस्थित होते. यावेळी या वैशिष्ट्यपूर्ण डायरीचे प्रकाशन करण्यात आले.
‘अमृत काळ डायरी २०२४-४७’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातील अत्यंत महत्त्वपूर्ण उतारे प्रत्येक पानावर आहेत. त्यात त्यांच्या १५ ऑगस्ट २०२३ रोजीच्या भाषणाचा संपूर्ण मजकूर समारोपाच्या पानांवर आहे. संचामधील दुसरी डायरी - 'इंडो-ग्लोबल टायज : ए न्यू सिम्फनी इन प्ले डायरी २०२४' मध्ये नरेंद्र मोदींच्या देशाबाहेरील विविध ठिकाणी केलेल्या भाषणांचे संस्मरणीय उतारे आहेत. सेटमधील तिसरी डायरी - 'कर्तव्य - भारत : विकास भी विरासत डायरी २०२४' मध्ये भारतातील महत्त्वाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, शिखर परिषदा आणि परिषदांमध्ये पंतप्रधानांच्या भाषणांचे उतारे आहेत.
नागरिकांमध्ये देशभक्ती, प्रेम आणि कर्तव्याची भावना जागृत करणे, तसेच तिचा अभिमानास्पद वारसा आणि प्रगतिशील विकासाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा या दैनंदिनी प्रकाशित करण्यामागचे उद्दिष्ट असल्याचे संदीप नाईक यांनी म्हटले आहे.