तपासणी न करताच मिळते पीयूसी, आरटीओचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 02:32 AM2018-11-14T02:32:05+5:302018-11-14T02:33:00+5:30
प्रदूषणाचा धोका : आरटीओचे दुर्लक्ष; शहरात सुमारे ५ लाख नोंदीत वाहने
योगेश पिंगळे
नवी मुंबई : वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या हानिकारक धुरामुळे वातावरणात जमा होणारा प्रदूषणाचा स्तर तपासण्यासाठी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) चाचणी केली जाते. सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ही चाचणी करून घेणे आवश्यक असताना, नवी मुंबई शहरात अनेक प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्रावर वाहनांची तपासणी न करताच प्रमाणपत्रे दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरटीओच्या दुर्लक्षामुळे शहरात अशा रीतीने प्रमाणपत्रे दिली जात असल्याने शहरात प्रदूषणाचा धोका वाढला आहे.
प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) हे प्रदूषण नियंत्रण अंतर्गत एक प्रमाणपत्र असून, पीयूसी चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर वाहनाला देण्यात येते. वाहनातून बाहेर पडणाºया धुरामुळे होणाºया वायुप्रदूषणासाठी मोटार वाहन नियम, १९८९ अंतर्गत वाहनासाठी पीयूसी प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. प्रत्येक आरटीओ कार्यालयांतर्गत त्या ठिकाणच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्रांना परवानगी देण्यात येते. नवी मुंबई परिवहन विभागाने नोंदणी केलेल्या वाहनांची संख्या सुमारे पाच लाख असून मुंबई, ठाणे, पुणे आदी ठिकाणी शहरातील विविध मार्गांवरून लाखो वाहने दररोज ये-जा करतात. नवी मुंबई आरटीओ कार्यालयाने शहरात एकूण ५९ प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्राला मान्यता देण्यात आली आहे. यामधील डिझेलवर चालणाºया वाहनांची तपासणी करणारी पाच, पेट्रोलवर चालणाºया वाहनांची तपासणी करण्यासाठी आठ आणि डिझेल आणि पेट्रोल या दोन्ही इंधनांवर चालणाºया वाहनांची तपासणी करणाºया ४६ केंद्रांना मान्यता दिली आहे. शहरात अनेक ठिकाणच्या महत्त्वाच्या रस्त्यांवर, पदपथावर, पेट्रोल पंप आदी ठिकाणी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देणारी वाहने उभी केली जात असून, यामधील अनेक प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्र बोगस असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेक प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्रावर वाहने तपासणी न करताच, ५० रुपये शुल्क आकारून वाहन योग्य असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे, त्यामुळे बोगस प्रमाणपत्रांचा सुळसुळाट झाला असून, प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे.
मोबाइल पीयूसी केंद्रांमुळे अपघाताचा धोका
वाहनांमधून सुरू असलेल्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्राला मोबाइल प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र केंद्र म्हटले जाते. शहरातील सायन-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर रस्ता, पामबीच मार्ग, उरण रोड आदी महत्त्वाचे रस्ते आणि पदपथावर मोबाइल केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असल्याने अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे.
शहरातील पीयूसी केंद्रांवर अचानक धाडी टाकल्या जाणार आहेत. वाहने तपासणी न करता प्रमाणपत्रे देणे, बेकादेशीर चालणारी केंद्रे, तसेच नियमावली न पाळणाºया केंद्रांचा परवाना रद्द केला जाणार आहे.
- दशरथ वाघुले,
उपप्रादेशिक
परिवहन अधिकारी