ठाणे : शिवसेनेत बंडखोरी शमवण्यासाठी नेत्यांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. असे असले तरीही ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अगदी जवळचे मानल्या जाणाऱ्या गणेश वाघ यांच्या पत्नीला उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारले आहे. कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, असा हट्ट पूजा वाघ यांनी धरला असून त्यासाठी पक्षाच्या अधिकृत उमेदवार पल्लवी पवन कदम यांना माघार घेण्याची गळ घातली जात असल्याची माहिती समोर आली आहे. प्रभाग क्रमांक २२ मध्ये सध्या हा वाद सुरू झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी काही शिवसैनिकांनी कदम यांच्या घरी जाऊन तिकीट मागे घेण्यासाठी त्यांना घेरावही घातला होता. दरम्यान, पूजा वाघ या शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका असून त्यांना पालिकेच्या आरोग्य समितीचे सभापतीपदही देण्यात आले होते. प्रभाग क्र मांक २२ येथून उमेदवारी निश्चित मानली जाते होती. मात्र, पक्षाने त्यांचे तिकीट कापून प्रभागातील एका जागेवर त्यांची भावजय साधना महेश वाघ यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पूजा वाघ यांना धक्का बसला असून त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या आहेत. शनिवारी कार्यालयात पूजा आणि दुसऱ्या उमेदवार साधना वाघ यांच्यात हमरीतुमरीही झाल्याची माहिती आहे. मी अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहे, माझा निर्णय योग्य आहे की नाही, अशी विचारणा करणारी पोस्टही त्यांनी फेसबुकवर टाकली होती. तसेच, उमेदवारी न मिळाल्याचा जाब विचारण्यासाठी त्या टेंभीनाका येथील पक्षाच्या मुख्य कार्यालयातही गेल्या होत्या. आपल्या काही कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना त्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली असून त्यात प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांची नावे घेऊन त्यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याचे वक्तव्य केले होते. त्यांचा हा व्हिडीओ एका कार्यकर्त्याने फेसबुकवर अपलोड केला होता. मात्र, त्यामुळे वाद होण्याची शक्यता लक्षात घेऊन नंतर तो डिलीट करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
सेनेविरोधात पूजा वाघ यांचे बंड
By admin | Published: February 06, 2017 4:22 AM