कडधान्य कडाडले, ज्वारीही महागली; किचनचे बजेट बिघडले!
By नामदेव मोरे | Published: April 4, 2023 11:30 AM2023-04-04T11:30:12+5:302023-04-04T11:30:30+5:30
अवकाळी पावसाचा परिणाम
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : उन्हाच्या तीव्रतेबरोबर सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या झळांचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसाचा धान्याच्या दरांवर परिणाम झाला आहे. गहू, ज्वारी बाजरीच्या दरामध्ये वाढ झाली असून डाळी व कडधान्यांच्या दराने शतक ओलांडले आहे. त्यामुळे गृहिणींच्या किचनचे बजेट कोलमडू लागले आहे. धान्य, कडधान्यही आवाक्याबाहेर गेले तर आता खायचे काय, असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहक विचारत आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही जीवनावश्यक वस्तूंच्या किमती जवळपास १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. गेल्यावर्षी २३ ते २६ रुपये प्रतिकिलो दराने विकली जाणारी बाजरी २७ ते ४२ रुपये व ज्वारी २२ ते २९ रुपये प्रतिकिलोवरून २८ ते ५० रुपयांवर गेली आहे. गव्हाच्या किमती प्रतिकिलो २३ ते ३२ वरून २८ ते ५० रुपये प्रति किलोवर पोहोचल्या आहेत. किरकोळ मार्केटमध्ये चांगल्या दर्जाच्या गहू, ज्वारी, बाजरीने पन्नाशी ओलांडली आहे. उडीदडाळ, मूगडाळ, तूरडाळींनी होलसेल मार्केटमध्येच शंभरी ओलांडली आहे.
अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, बाजरीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. कडधान्याचे दरही सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर केले आहेत. त्यामुळे गृहिणींच्या किचनचे बजटच कोलमडले आहे.
होलसेल मार्केटमधील धान्य डाळींचे प्रतिकिलो बाजारभाव
वस्तू २०२२ २०२३
बाजरी २३ ते २६ २७ ते ४२
गहू २३ ते २६ २८ ते ३८
गहू लोकवन २४ ते ३० २७ ते ३६
गहू सीवूर २९ ते ३२ ३० ते ५०
ज्वारी २२ ते २९ २८ ते ५०
हरभरा ५२ ते ५७ ५० ते ६०
मसूर ७२ ते ७५ ६६ ते ७५
मसूरडाळ ७८ ते ८२ ७१ ते ७८
उडीद ५५ ते ६० ८० ते १०६
उडीदडाळ ८० ते १०० ८५ ते ११५
मूग ८५ ते १०० ८२ ते ११०
मूगडाळ ८७ ते १०५ ८० ते ११०
तूरडाळ ८५ ते १०५ ७५ ते ११५
शेंगदाणे ८० ते १०५ ९० ते १२०