पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांचा धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 03:03 AM2018-06-18T03:03:25+5:302018-06-18T03:03:25+5:30
शहरातील पावसाळी पर्यटनाचे आकर्षण केंद्र असलेल्या पांडवकड्याच्या ठिकाणी पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे.
नवी मुंबई : शहरातील पावसाळी पर्यटनाचे आकर्षण केंद्र असलेल्या पांडवकड्याच्या ठिकाणी पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे. अपुरा पोलीस बंदोबस्त असल्याने अनेक जण धोका पत्करून धबधब्याच्या ठिकाणी जात आहेत. त्यापैकी काही व्यसनी तरुण दारूच्या बाटल्यांसह हुक्का घेऊन पर्यटनाच्या नावाखाली त्या ठिकाणी धुडगूस घालताना दिसत आहेत.
पावसाळा सुरू झाली की, निसर्गप्रेमींची धबधब्याच्या दिशेने पावले वळू लागतात. त्यानुसार प्रतिवर्षी पावसाळ्यात खारघरच्या पांडवकडा धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. यापूर्वी अनेकदा त्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदीही घालण्यात आलेली आहे. त्यानंतरही पर्यटकांच्या उत्साहाला आवर घालण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. यामुळे सदर धबधबा पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यानुसार वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या पांडवकडा परिसराच्या विकासासाठी सिडकोने सुमारे दीड कोटींचा निधी दिलेला आहे; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा निधी जमा होऊनही त्या ठिकाणी सुरक्षा भिंतीव्यतिरिक्त अद्यापपर्यंत कसलेही विकासकाम झाल्याचे पाहायला मिळत नाही. तर एका अर्धवट झालेल्या खोदकामात पाणी साचल्याने त्या ठिकाणीही मृत्यूचा सापळा तयार झाला आहे. यामुळे पांडवकड्याच्या दिशेने जाणाºया पर्यटकांना जीवाचा धोका पत्कारावा लागत आहे.
मुख्य रस्त्यापासून धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नाही, यामुळे मोकळ्या मैदानातून वाहत्या पाण्याचे पाट ओलांडत पर्यटकांना धबधब्यापर्यंत जावे लागते; परंतु मुसळधार पावसामुळे वाहत्या पाण्याचा प्रवास वाढल्यास तो ओलांडताना तोल जाऊन काही जण वाहूनही गेले आहेत. तर धबधब्याखालील पाण्यात उंचावरून उडी मारण्याचा प्रयत्न अनेकांच्या जीवावर बेतलेला आहे. यानंतरही जीवावर उदार होऊन उंचावरून धबधब्याखाली साचलेल्या पाण्यात उडी मारण्याचे स्टंट त्या ठिकाणी होत आहेत. मागील दहा वर्षांत २६हून अधिक पर्यटकांचा त्या ठिकाणी बुडून अथवा वाहून मृत्यू झालेला आहे.
निसर्ग पर्यटनाच्या नावाखाली धबधब्याच्या ठिकाणी व्यसनी तरुणांच्या पार्ट्या रंगत आहेत. त्याकरिता नवी मुंबईसह मुंबई परिसरातील व्यसनी तरुण त्या ठिकाणी जमा होताना दिसत आहेत. ते दारूच्या बाटल्यांसह हुक्काही सोबत घेऊन येत असल्याचे पाहायला मिळत आहे, त्यांच्याकडून मद्यधुंद अवस्थेत एखाद्या महिला किंवा तरुणीची छेड काढली जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. यामुळे त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असतानाही खारघर पोलिसांना त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. अवघ्या तीन पोलिसांवर पर्यटकांना अटकाव घालण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. मात्र, त्यांना चकमा देऊन पर्यटक जीवाचा धोका
पत्करून थेट धबधब्यापर्यंत पोहोचत आहेत.
>बंदी झुगारून पर्यटकांची गर्दी
पहिल्या पावसातच पांडवकडा धबधबा धो-धो वाहायला सुरु वात झाली आहे. यातच रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटकांनी बंदी झुगारून खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर एकच गर्दी केली होती. विशेष म्हणजे, यावर्षी अद्याप पर्यटकांना प्रवेश देण्याबाबतचा निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे संभ्रमात असलेल्या तेथील सुरक्षारक्षकांची पर्यटकांना रोखताना एकच तारांबळ उडाली.त्यामुळे खारघरसह पनवेल, नवी मुंबई व परिसरातील पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केली; परंतु खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना प्रवेश देण्याबाबत नगरसेविका लीना गरड यांनी वनविभागाचे अधिकारी डी. एस. सोनावणे यांना नुकतेच पत्र दिले आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी वनविभागाचे अधिकारी, नगरसेविका, आमदार यांची बैठक सोमवारी पार पडणार आहे; परंतु बंदी उठविण्याचा निर्णय होण्यापूर्वीच पर्यटक बेभान होऊन विविध मार्गावरून पांडवकडा धबधबा परिसरात प्रवेश करताना दिसून आले. या परिसरात गुरु द्वाराजवळ सिडकोमार्फत खोदण्यात आलेल्या तलावात पाणी साचले आहे. पर्यटकांना या ठिकाणाचा अंदाज न येता दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता आहे.
>तरुणांमध्ये हल्ली हुक्क्याची क्रेझ वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. हुक्क्याची तलप भागवण्यासाठी काही जण स्वत:सोबत इलेक्ट्रॉनिक हुक्काही बाळगत आहेत. अशातच हुक्का पार्लरमध्ये वापरला जाणारा हुक्का सोबत घेऊन पांडवकड्याच्या ठिकाणी येत आहेत. तर काही महाविद्यालयीन तरुण सोबत असलेल्या बॅगमध्ये लपवून दारूच्या बाटल्या घेऊन येत आहेत, त्यांच्याकडून सार्वजनिक ठिकाणी नशा केली जात आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
>धोक्याची पायवाट : पांडवकड्याकडे जाण्यासाठी वापरल्या जाणाºया पायवाटेवर अनेक ठिकाणी पाण्याचे प्रवाह आहेत. आडवे येणारे हे प्रवाह ओलांडण्याच्या प्रयत्नात खोलीचा अंदाज न आल्यास, त्या ठिकाणी तोल जाऊन पर्यटक पडण्याचेही प्रकार घडतात, अशा वेळी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यात स्वत:ला न सावरता आल्याने प्रवाहात काही पर्यटक वाहूनही गेलेले आहेत. त्यानंतरही बंदी धुडकारून पांडवकड्याच्या दिशेने पर्यटकांची रीघ सुरूच आहे.