लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई
सोशल मीडियावर भाईगिरीच्या रील्स बनवून वातावरण तापवणारे प्रकार पुण्यापाठोपाठ नवी मुंबईतही घडू लागले आहेत. विशेष म्हणजे अशा रील्समधून थेट नशा विक्रीच्या अड्ड्यांची माहितीही सांगितली जात आहे. यानंतरही संबंधित तरुण, नशेच्या अड्यांवर कारवाई होत नसल्याने पोलिसच अशा कृत्यांपासून अनभिज्ञ असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.
युक्रेन युद्धात 'मधमाशांचे पोळे'बनले नवे शस्त्र! कीव सैन्याने रशियाच्या सैन्यावर फेकले
नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ड्रग्समुक्त शहराचे अभियान हाती घेतले आहे. परंतु, स्थानिक पातळीवर अद्यापही अनेक ठिकाणी उघडपणे गांजासह इतरही अमली पदार्थ विकले जात आहेत. सर्वाधिक अड्डे हे बहुतांश पोलिस ठाण्याच्या हद्दीतील झोपड्यांमध्ये चालत आहेत. परिणामी, मुंबई परिसरातले गुन्हेगारदेखील नवी मुंबई शहरात नशा करण्यासाठी येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यांच्याकडून बेधडक रील्समध्ये भाईगिरी करत बेलापूरमध्ये नशेच्या अड्ड्यांचा उल्लेखदेखील केला जात आहे. यावरून नवी मुंबईचे 'सोशल' वातावरण तापत असल्याचे दिसून येत आहे.
शहराला गालबोट लावणाऱ्याची दहशत
काही नवी मुंबईकर तरुणांकडून त्या नशेबाज तरुणांना रील्समध्ये नवी मुंबईच्या नावाला गालबोट न लावण्याच्या सूचना केल्यास, त्यांना धमक्यादेखील मिळत आहेत. काहींनी थेट नवी मुंबई पोलिसांच्या सोशल मीडियाला टॅग करून या गुन्हेगारी रील्स बाबतची माहितीही कळवली आहे. परंतु, चिथावणी देणाऱ्या ना रील्स हटल्या, ना अमली पदार्थ विकणाऱ्या अमली पदार्थ विकणाऱ्या अड्ड्यांवर कारवाई झाली.
संबंधित तरुण कुर्ला परिसरातले असून, त्यांना नवी मुंबईच्या 'गुण बंधूंची' साथ मिळताना दिसत आहे. त्यामुळे शहरात चालणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांबाबत पोलिस अनभिज्ञ आहेत, की खाकीतूनच अमली पदार्थ विक्रेत्यांची पाठराखण होतेय? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
पोलिस आयुक्तांच्या प्रतिमेला धक्कास्थानिक पोलिसांकडून प्रभावीपणे अमली पदार्थविरोधी कारवाया होत नाहीत. त्यामुळे पोलिस आयुक्तांच्या प्रतिमेलाच धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न पोलिसांकडूनच होत असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण प्रकारांमधून नवी मुंबईला गालबोट लागत असून, अशा गुन्हेगारी रील्सला प्रेरित होऊन इतरांनाही बळ मिळताना दिसत आहे.