नवी मुंबईकरांना काळ्या पिवळ्या पाण्याची शिक्षा
By नामदेव मोरे | Published: December 20, 2023 07:56 PM2023-12-20T19:56:37+5:302023-12-20T19:57:24+5:30
दूषीत पाण्यामुळे नागरिक त्रस्त : नागरिकांचे आरोग्य बिघडले
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: नेरूळमधील सारसोळे परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून दुषीत पाणीपुरवठा होत आहे. नळातून काळे, पिवळे पाणी येत असून रहिवासी त्रस्त झाले आहेत. दूषीत पाण्यामुळे आरोग्य बिघडू लागले असून नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये दूषित पाण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. नळातून गढूळ पाणी येवू लागले आहे. घणसोलीपासून नेरूळपर्यंत कमी अधिक फरकाने ही समस्या सुरू झाली आहे. सारसोळे सेक्टर ६ मध्ये सर्वाधीक गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी येवू लागल्या आहेत. अनेक सोसायटीमध्ये नळातून पिवळे, काळे पाणी येत असून हे पाणी वापरण्यायोग्य नसल्यामुळे पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दुषीत पाणी प्यायल्यामुळे अनेकांचे आरोग्य बिघडू लागले आहे.
माजी नगरसेवक सुरज पाटील यांनी याविषयी पाणीपुरवठा विभाग व आयुक्तांकडे तक्रार केली आहे. परिसरातील व्हॉल्व बदलला असल्यामुळे काही ठिकाणी गढूळ पाणी येत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु प्रत्यक्षात दूषीत पाण्याची समस्या गंभीर असून त्याची कारणे शोधून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. घरातील दूषित पाण्याचे फोटोही नागरिकांनी अधिकाऱ्यांना पाठविले आहेत.
सारसोळे परिसरामध्ये दूषित पाण्याचे प्रमाण वाढले आहे. पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू लागले आहे. प्रशासनाने तत्काळ ठोस उपाययोजना करावी यासाठी आयुक्तांना पत्र पाठविले आहे.- सुरज पाटील, माजी नगरसेवक