पनवेलच्या नदीचे शुद्धीकरण !
By admin | Published: April 5, 2016 01:56 AM2016-04-05T01:56:22+5:302016-04-05T01:56:22+5:30
पनवेलमध्ये नद्यांचे शुध्दीकरण व सुशोभीकरणाचा महत्त्वाकांक्षी निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला
प्रशांत शेडगे, पनवेल
पनवेलमध्ये नद्यांचे शुध्दीकरण व सुशोभीकरणाचा महत्त्वाकांक्षी निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
पनवेल परिसरातून गाढी, काळुंद्रे, कासाडी या नद्या वाहतात. यापैकी मुख्य नदी म्हणून ओळखली जाणारी गाढी नदीचा उगम माथेरानच्या डोंगररांगातून होतो. नदीचे पात्र मोठे असले तरी गावातील लोकांनी नदीकिनारी अतिक्रमण केले आहे. सुकापूर, देवद, विचुंबे, आकुर्ली, नेरे या गावातील सांडपाणी सोडले जाते. शिवाय परिसरातील ग्रामपंचायतीही याच नदीत कचरा टाकतात. त्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले असून दुर्गंधी येत आहे.
काळुंद्रे नदीची स्थिती फारशी चांगली नाही. याही नदीपात्रात सांडपाणी, कचरा टाकण्यात येतो. कासाडी नदीचा उगम शिरवलीच्या डोंगरातून होत असून ती तळोजा एमआयडीसीतून खाडीला मिळते. याबाबत पनवेल तहसील कार्यालयात बैठक घेण्यात असून ८ एप्रिलला गाढी नदीची परिक्रमा करण्यात येणार आहे.
> नदीवर बंधारे
नदीवर बंधारे बांधून शेती व अन्य कारणासाठी पाण्याचा उपयोग करण्यात येणार आहे. मोहिमकरिता निधी उपलब्ध व्हावा, यासाठी काही कंपन्यांशी संपर्क साधण्यात येणार असून नागरिक, तसेच सामाजिक संस्थांनीही यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन तहसीलकडून करण्यात आले आहे.
> तज्ज्ञांच्या माध्यमातून सर्वेक्षण
नद्यांच्या परिक्रमेंतर्गत उगमापासून नदीपात्राच्या विस्तारापर्यंत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामध्ये अनधिकृत बांधकाम, सांडपाणी, घनकचरा कुठे कुठे टाकण्यात येतो, याबाबत माहिती घेण्यात येणार आहे. त्यानुसार त्वरित नियोजन करून आराखडा तयार करण्यात येईल. पनवेल नगरपालिका हद्दीत ज्याप्रमाणे राजीव गांधी उद्यान गाढी नदीच्या किनाऱ्यावर विकसित करण्यात आले आहे, त्या धर्तीवर सुशोभीकरणाबाबत चाचपणी करण्यात येणार आहे.