काँक्रीटीकरणासाठी पालिकेला बसणार साडेचार कोटींचा भुर्दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 02:45 AM2019-06-27T02:45:40+5:302019-06-27T02:45:49+5:30
उरण फाटा ते तुर्भे उड्डाणपुलापर्यंतच्या सर्व्हिस रोडच्या कामाचे काँक्रीटीकरण करण्याचा ३८ कोटी ६९ लाख रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीने सप्टेंबर २०१८ मध्ये फेटाळला होता.
नवी मुंबई : उरण फाटा ते तुर्भे उड्डाणपुलापर्यंतच्या सर्व्हिस रोडच्या कामाचे काँक्रीटीकरण करण्याचा ३८ कोटी ६९ लाख रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीने सप्टेंबर २०१८ मध्ये फेटाळला होता. फेरनिविदेमध्ये कामाची रक्कम ४२ कोटी ८९ लाखांवर गेली आहे. पालिकेवर ४ कोटी ५९ लाख रुपयांचा भुर्दंड पडणार असून स्थायी समिती काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महानगरपालिकेने औद्योगिक वसाहतीमधील प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सायन - पनवेल महामार्गाला लागून असलेल्या उरण फाटा ते तुर्भे उड्डाणपुलापर्यंतच्या सर्व्हिस रोडचे काँक्रीटीकरणाचाही यामध्ये समावेश होता. प्रशासनाने मार्च २०१८ मध्ये या कामासाठी निविदा मागविल्या होत्या. प्रक्रिया पूर्ण करून सप्टेंबर २०१८ च्या सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. ३८ कोटी ३० लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीने कोणतेही सबळ कारण न देता नामंजूर केला होता. यामुळे यासाठी फेरनिविदा मागविण्यात आली. गुरुवारी २७ जूनला होणाऱ्या स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी येणार आहे. ३८ कोटींचे काम ४ कोटी ५९ लाखाने वाढले असून थेट ४२ कोटी ५९ लाख रुपयांवर गेले आहे.
या प्रस्तावावर आयुक्तांनी त्यांचा अभिप्राय दिला आहे. फेरनिविदेनंतर प्राप्त झालेली निविदेतील रक्कम पूर्वीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सदर प्रस्ताव महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ७३ (क) नुसार मंजूर केल्यास होणाºया जास्त खर्चाच्या रकमेस प्रशासन जबाबदार राहणार नाही व त्याची सर्वस्वी जबाबदारी तत्कालीन स्थायी समिती सदस्यांची राहील. सदर कामाची प्रचलित दराने सुधारित अंदाजपत्रकीय रक्कम ५० कोटी २७ लाख इतकी आहे. वरील सर्व बाबींचा विचार करून स्थायी समितीने योग्य निर्णय घ्यावा ही विनंती, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. यामुळे स्थायी समितीमध्ये नक्की काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.