- अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : पनवेल परिसरातील शासकीय वसाहतींमधील घरांना यापुढे प्रीपेड वीजमीटर बसविण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे. जितके पैसे तितके वीज बिल या धर्तीवर संबंधितांना वीज देता येणार आहे. त्याचबरोबर थकबाकीही कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास अधिका-यांनी व्यक्त केला आहे.वाढत्या वीज ग्राहकांबरोबर थकबाकीचे प्रमाणही वाढते. अनेकदा थकबाकी भरण्यास ग्राहकांकडून उदासीनता दर्शवली जाते. विशेष करून, शासकीय वसाहतींमध्ये राहत असलेले चाकरमानी बदली झाल्यानंतर वीज बिल न भरता दुसरीकडे स्थलांतरित होतात, त्यामुळे त्यांचे बिल मोठ्या प्रमाणात थकीत राहते. त्या ठिकाणी नवीन राहण्याकरिता आलेले रहिवासी थकीत बिल भरण्यास तयार होत नाहीत. त्याचबरोबर शासकीय यंत्रणेकडे अशा प्रकारे थकीत रक्कम भरण्याकरिता कोणतीही तरतूद नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून महावितरण कंपनीने शासकीय वसाहतींमधील घरांना प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय घेतला आहे.पनवेल तालुक्याचा विचार करता, पनवेल, कळंबोली या ठिकाणी शासकीय वसाहती असून, विविध विभागांत काम करणारे हजारो कर्मचारी राहतात. त्यांना तिथे प्रीपेड मीटरद्वारे वीज दिली जाणार आहे. त्याबाबत प्रक्रि या सुरू करण्यात आली असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. त्या मीटरमध्ये सिम कार्ड आकाराचे कार्ड असेल. जितकी रक्कम खात्यात जमा करणार तितकीच वीज संबंधितांना उपलब्ध होईल.>खारघरला तीन हजार प्रीपेड मीटरखारघर वसाहतीत अनेक टोलेजंग इमारती आहेत. त्यानुसार महावितरण कंपनीने जवळपास तीन हजार ग्राहकांना प्रीपेड वीज मीटरद्वारे वीज दिली जात आहे. विशेष म्हणजे, या खासगी सोसायट्या आहेत. त्यामुळे थकबाकी कमी झाली असल्याचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनायक बुधवंत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ही योजना ग्राहक आणि महावितरणच्या दृष्टीने फायदेशीर आहेच, त्याचबरोबर व्यवहारात अचूकता, पारदर्शकता आणणारी असल्याचे ते म्हणाले.प्रीपेड वीजमीटर योजना खारघरमध्ये आधीपासूनच सुरू केली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम वसुली आणि इतर गोष्टींवर दिसून येत आहे. आगामी काळात नियमानुसार शासकीय घरांनाही अशा प्रकारचे मीटर बसविण्यात येणार आहेत. त्या दृष्टिकोनातून महावितरणकडून तयारी सुरू केली आहे.- माणिक राठोड, कार्यकारी अभियंता, महावितरण, पनवेल विभाग
पनवेलमध्ये प्रीपेड वीजमीटर, थकबाकी कमी करण्याचा उद्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 2:31 AM