महामार्गावर रामनगर भागात गतिरोधक टाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 01:28 AM2020-11-25T01:28:19+5:302020-11-25T01:28:26+5:30
नागरिकांची मागणी
नागोठणे : रामनगर तसेच जोगेश्वरीनगर भागात जाण्यासाठी महामार्ग ओलांडावा लागत असतो. मात्र, येथे गतिरोधक टाकले नसल्याने दोन्ही बाजूंनी भरधाव वाहने जात असल्याने पादचाऱ्यांना अनेकदा अपघाताला सामोरे जावे लागत असते. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्णच होत नसल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी गतिरोधक उभारावेत, अशी मागणी या प्रभागाचे स्थानिक ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे यांनी केली आहे.
येथील खडकआळी आणि आंगरआळी परिसरात मुंबई-गोवा महामार्गाच्या पलीकडे पूर्व बाजूला रामनगर आणि जोगेश्वरीनगर या नागरी वसाहती असून या ठिकाणी शेकडो घरे आहेत. बाजारहाट किंवा इतर कोणत्याही कामासाठी येथील नागरिकांना महामार्ग ओलांडून नागोठणे शहरात यावे लागत असते. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षे उलटूनही पूर्णच होत नसल्याने जुन्या महामार्गावरूनच दोन्ही बाजूंनी वाहतूक चालू आहे.
वाहने भरधाव असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागत असतो. यामुळे पादचाऱ्यांना ठोकर बसून अनेकदा अपघात होत आहेत. असाच एक अपघात मागील आठवड्यात झाला असल्याचे ज्ञानेश्वर साळुंखे यांनी सांगितले. याच भागाचे पुढे १००-१५० मीटर अंतरावर गतिरोधक बसविले आहेत. मात्र, वर्दळ असलेल्या खडकआळी आणि आंगरआळी भागातील महामार्गावर गतिरोधक बसविण्यासाठी महामार्ग प्राधिकारणाचा दुजाभाव कशासाठी, असा साळुंखे यांचा सवाल आहे.