खुटारवाडी धरणात पोहा, धबधब्यात भिजा!
By admin | Published: July 4, 2015 11:36 PM2015-07-04T23:36:01+5:302015-07-04T23:36:01+5:30
मुरबाड तालुक्यातील पाडाळे (खुटारवाडी) धरण लोकांची तहान भागविण्यासाठी व शेतीला संपन्न करण्यासाठी बांधले असले तरी या धरणावर मनसोक्त आनंद लुटण्यासाठी अनेक हौशी लोक येतात.
सुधाकर वाघ, धसई
मुरबाड तालुक्यातील पाडाळे (खुटारवाडी) धरण लोकांची तहान भागविण्यासाठी व शेतीला संपन्न करण्यासाठी बांधले असले तरी या धरणावर मनसोक्त आनंद लुटण्यासाठी अनेक हौशी लोक येतात. या धरणामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून उगम पावणाऱ्या भामकोर नदीचे पाणी येत असून हे नव्यानेच बांधण्यात आले आहे. त्याच्या बांधावरून पडणारे पाणी धबधब्यासारखे असल्याने ते मनमोहक दिसते.
या ठिकाणी मुरबाड- म्हसामार्गे गोरखगड येथून जाता येते. तसेच मुरबाड-सरळगावमार्गे पाडाळे येथूनही धरणावर जाता येते. या धरणामध्ये पाण्याचा मुबलक साठा असून कालव्याचे काम सुरू असल्याने उन्हाळ्यात शेतीसाठी अजून तरी पाणी मिळत नाही. धरण भरलेले असल्याने १०० फूट लांबीच्या सांडव्यावरून पडणाऱ्या धबधब्यात भिजण्याचा आनंद खूप छान असतो. या धरणाच्या पाण्यात भिजण्यासाठी अनेक लोक रविवारच्या सुटीत मनसोक्त पोहण्यास व भिजण्याची हौस भागविण्यासाठी येतात. तसेच हे ठिकाण सुरक्षित असल्याने लोक पाडाळे-खुटारवाडी धरणाकडे वळतात.
जवळच गोरखगड, मच्छिंद्रगड तसेच चोंडीचा भव्य धबधबाही आहे. या धरण परिसरात खाद्यपदार्थ मिळत नसल्याने येतानाच जेवणाचा डबा घेऊन जावे लागते. पिण्याचे पाणी धरणालगतच असलेल्या खुटारवाडीतून बोअरवेलमधून घेता येते.
या धरणाच्या सांडव्यावरून पडणारे पाणी २५-३० फुटांच्या उंचीवरून एका मोठ्या हौदासारख्या भागात पडते. तेच दुसऱ्या टप्प्यात १०-१२ फुटांवरून नदीत पडते. त्यामुळे येथे भिजण्याची व पोहण्याची अशी दुहेरी हौस भागविता येते.