पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात खळ्ळ खट्याक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:58 AM2018-07-17T01:58:10+5:302018-07-17T01:58:20+5:30
सायन-पनवेल महामार्गावरील खड्ड्यांवरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी तुर्भेतील पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली.
नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील खड्ड्यांवरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी तुर्भेतील पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत असून, गत दहा दिवसांत दोघांचे बळी गेले आहेत. त्यानंतरही महामार्गावरील खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात खळ्ळ खट्याक आंदोलन केले.
सायन-पनवेल महामार्गावर मागील दहा दिवसांत दोघा मोटारसायकलस्वारांचे प्राण गेले आहेत. प्रतिवर्षी सायन-पनवेल महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेकांना मृत्यूच्या दाढेत जावे लागत आहे. यामुळे गत आठवड्यात मनसेने आंदोलन करुन खड्ड्यांमुळे घडणाऱ्या अपघातांना मंत्री, अधिकारी व ठेकेदार यांना दोषी धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचीही मागणी मनसेने केली आहे. त्यानंतरही खड्डे बुजवले जात नसल्याने सोमवारी सकाळी शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली नितीन खानविलकर, नितीन चव्हाण, राजू खाडे, विशाल भिलारे व श्याम ढमाले यांनी पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात खळ्ळ खट्याक आंदोलन केले. अधिकाºयांच्या दालनातील तसेच सभागृहातील टेबल, खुर्च्या, संगणक यासह खिडक्यांच्या काचांची त्यांनी तोडफोड केली. तसेच मंत्री एकनाथ शिंदे, प्रवीण पोटे, चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
तीन दिवसांपूर्वीच मनसेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार कार्यालयात घुसलेल्या मनसैनिकांनी अधिकाºयांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला, परंतु कार्यालयात एकही अधिकारी हजर नसल्याने त्यांनी तोडफोड करून आपला रोष व्यक्त केला. मनसेने अचानकपणे केलेल्या या सर्जिकल स्ट्राइकची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु तोडफोड केल्यानंतर काही वेळातच शहरातील सर्व मनसैनिक भूमिगत झाले.
दुपारपर्यंत पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास प्रमुख आंदोलकांनी स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले.
>आंदोलकांना न्यायालयीन कोठडी
पीडब्ल्यूडीचे कार्यालय फोडल्यानंतर पाचही मनसैनिकांना संध्याकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी देखील पीडब्ल्यूडीच्या वतीने एकही अधिकारी न्यायालयात उपस्थित नव्हता. अखेर पाचही मनसैनिकांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
>महामार्गावरील खड्डे बुजवले जावे याकरिता सातत्याने पीडब्ल्यूडीकडे पत्रव्यवहार, तसेच आंदोलन देखील केलेले आहे. यानंतरही संबंधित खात्याचे मंत्री व अधिकारी यांना जाग येत नव्हती. यामुळे पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात खळ्ळ खट्याकचा आवाज करून अधिकाऱ्यांची झोप उडवण्यात आली आहे, तर येत्या काही दिवसात खड्डे न बुजवले गेल्यास व दोषींवर गुन्हा दाखल न झाल्यास पुढचे खळ्ळ खट्याक आंदोलन मंत्रालयात होईल.
- गजानन काळे,
शहराध्यक्ष, मनसे