माथेरानची राणी लवकरच रुळावर!

By admin | Published: January 12, 2017 06:08 AM2017-01-12T06:08:19+5:302017-01-12T06:08:19+5:30

पर्यटकांचे आकर्षण आणि माथेरानची जीवनवाहिनी असलेली माथेरानची मिनीट्रेन सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने

The Queen of Matheran is on a fast track! | माथेरानची राणी लवकरच रुळावर!

माथेरानची राणी लवकरच रुळावर!

Next

अजय कदम / माथेरान
पर्यटकांचे आकर्षण आणि माथेरानची जीवनवाहिनी असलेली माथेरानची मिनीट्रेन सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून, यासाठी आवश्यक दुरु स्ती आणि उपाययोजनांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून ६.८ कोटींचा प्रकल्प निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.
मे २०१६ मध्ये लागोपाठ दोन वेळा माथेरान मिनीट्रेनचे डब्बे रुळावरून घसरल्याने नेरळ-माथेरान मिनीट्रेन सेवा आणि अमन लॉज ते माथेरान शटल सेवा बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. यामुळे माथेरानच्या पर्यटन आणि जनजीवनावर याचा विपरित परिणाम झाला आहे. यामुळे सर्व लोकप्रतिनिधींनी रेल्वेमंत्र्यांना भेटून ही सेवा पूर्ववत करण्याची विनंती केली होती. मात्र, सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्याशिवाय ही सेवा सुरू करणे शक्य नसल्याची ठाम भूमिका रेल्वे प्रशासनाची होती. आता यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने सुरक्षिततेच्या उपाययोजना योजना निश्चित केल्या असून, त्यासाठी आवश्यक निधी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजूर केला असून, राज्य शासनही यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. मिनीट्रेन सुरू करण्याच्या दृष्टीने सुरक्षिततेचे उपाय म्हणून ५६५० मीटर लांबीचे संरक्षक कठडे उभारण्यात येणार आहेत. १५०० मीटर लांबीची संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे, तर ५०० मीटर लांबीची दगडी संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. याशिवाय सर्व डब्बे आणि इंजिन एअर ब्रेक प्रणालीने परिपूर्ण करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने काम सुरू आहे.

शटल सेवा लवकरच
 या मार्गावरील रेल्वे रूळ सुरक्षित करण्याचे काम सुरू झाले आहे. नेरळ-माथेरान मिनीट्रेन लवकर सुरू व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे. मात्र, अमन लॉज ते माथेरान दरम्यान तीन किलोमीटर अंतराची शटल सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
 या दृष्टीने रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांनी चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. रेल्वे मार्ग सुरळीत होताच ही चाचणी पूर्ण करण्यात येईल. सध्या आमच्याकडे एअर ब्रेक प्रणालीसाठी योग्य ६०० अश्वशक्तीचे एक इंजिन आणि आठ डब्बे आहेत.
पहिल्या टप्प्यात अमन लॉज ते माथेरान शटल सेवेसाठी याचा वापर केला जाईल. मंगळवारी रेल्वेचे विभागीय अभियंता आणि सहायक अभियंता यांनीही नेरळ येथे येऊन लोकोशेडला भेट दिल्याने माथेरान मिनीट्रेन लवकर सुरू होण्याच्या हालचाली दिसू लागल्या आहेत.

Web Title: The Queen of Matheran is on a fast track!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.