- वैभव गायकर
पनवेल : पनवेलमध्येही धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. महापालिका कार्यक्षेत्रात ६० इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. अनेक इमारतींमध्ये नागरिक वास्तव्य करत असून पावसाळ्यात अपघात होऊन जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरात कोळीवाडा परिसरात शंकर मंदिर परिसरात मालमत्ता क्र मांक १२00 या इमारतीची भिंत शुक्र वारी कोसळली. खबरदारी म्हणून पालिका प्रशासनाने इमारत पाडली. मात्र या घटनेनंतर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जुने शहर असल्याने शहरात मोठ्या संख्येने जुन्या इमारती आहे. पालिकेने सर्व्हे करून धोकादायक इमारतीची यादी जाहीर केली आहे. संबंधित इमारतींना नोटिसा देखील बजावलेल्या आहेत. मात्र अद्यापही अनेक इमारतींमध्ये रहिवासी वास्तव्यास असल्याने अशाप्रकारची हलगर्जी जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्याच्या घडीला २0 ते २५ धोकादायक इमारतींमध्ये रहिवाशांचे वास्तव आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत अनुचित प्रकार घडला तर त्या घटनेला कारणीभूत कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष पालिकेने धोकादायक केलेल्या अनेक इमारतींमध्ये महत्त्वाच्या कार्यालयाचा समावेश आहे. या यादीमध्ये भूखंड क्र मांक १२६ मधील इमारतीमध्ये एलआयसीचे कार्यालय आहे.
नागरिकांची देखील या कार्यालयात सततची ये-जा असते. अशाच पद्धतीने अनेक इमारतीमध्ये कार्यालये तसेच रहिवासी संकुले आहेत. शहरातील धोकादायक इमारती अतिशय जीर्ण झालेल्या असतात. १0३ धोकादायक इमारतींमधील ६0 इमारती या पनवेल शहरात आहेत, तर उर्वरित इमारती या संपूर्ण ड प्रभागात आहेत.धोकादायक इमारतीमध्ये एलआयसीचे कार्यालयपालिकेने धोकादायक घोषित केलेल्या भूखंड क्र मांक १२६ मध्ये एलआयसीचे कार्यालय आहे. या कार्यालयात नागरिकांची देखील मोठी वर्दळ असते.
पनवेल शहरात ६0 इमारती धोकादायक आहेत. संपूर्ण प्रभागात धोकादायक इमारतींची संख्या १0३ आहे. सर्वांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. मात्र अद्यापही २0 ते २५ इमारतीमध्ये रहिवाशांचे वास्तव्य आहे.- श्रीराम हजारे, प्रभाग अधिकारी,ड प्रभाग समिती