धूलिकण, ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 12:53 AM2018-08-24T00:53:32+5:302018-08-24T00:54:16+5:30

शांतता क्षेत्रातही गोंगाट सुरूच; वाहनांची वाढती संख्या ठरतेय डोकेदुखी

The question of dust, noise pollution is serious | धूलिकण, ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न गंभीर

धूलिकण, ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न गंभीर

googlenewsNext

- नामदेव मोरे 

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये धूलिकणांचे (पीएम १०) प्रमाण मर्यादेपेक्षा तिप्पट झाले आहे. बहुतांश सर्व क्षेत्रामध्ये ध्वनिप्रदूषण वाढू लागले आहे. शांतता क्षेत्र घोषित केलेल्या परिसरामध्येही गोंगाट वाढत आहे. दोन्ही प्रदूषण रोखण्याचे आव्हान निर्माण झाले असून, अशीच स्थिती राहिली तर त्याचे गंभीर परिणाम शहरवासीयांवर होण्याची शक्यता आहे.
देशातील प्रदूषित शहरांमध्ये नवी मुंबईचाही समावेश होतो. पाच वर्षांपूर्वी प्रदूषणाची स्थिती गंभीर झाली होती. मागील अनेक वर्षांपासून महानगरपालिकेने प्रदूषण कमी करण्यासाठी सातत्याने ठोस पावले उचलली आहेत. यामुळे सल्फरडाय व नायट्रोजन आॅक्साइडचे प्रमाण नियंत्रणामध्ये ठेवण्यास यश आले आहे. आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या पीएम २.५ चे प्रमाणही तुर्भे वगळता इतर परिसरामध्ये नियंत्रणामध्ये आले आहे. ओझोेन प्रदूषण रोखण्यातही यश आले आहे, परंतु पीएम १० चे अर्थात धूलिकणांचे प्रमाण अद्याप नियंत्रणामध्ये येऊ शकलेले नाही. पीएम १० मध्ये नायट्रेड व सल्फेटसारखी सेंद्रिय रसायने, धातू व धूलिकण यांचा समावेश असतो. हवेत हे प्रमाण सरासरी ६० एवढे असणे आवश्यक असते; परंतु नवी मुंबईमध्ये ऐरोली परिसरामध्ये ९०, कोपरखैरणे परिसरामध्ये १३३ व तुर्भे परिसरामध्ये १५४ एवढे आहे. हवा प्रदूषके श्वसन आणि फुप्फुसामार्गे मानवी शरीरात प्रवेश करतात. यामुळे श्वसनसंस्थेशी निगडित आजार होतात. अस्थमा, कर्करोग, न्यूमोनिया, मेसाथेलियोमा, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजार होत असतात.
नवी मुंबईमध्ये हवेपेक्षा ध्वनिप्रदूषणाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. रहिवासी क्षेत्रामधील नोंदी दिवसाच्या निर्धारित निकष मर्यादेचे (५५ डेसिबल)उल्लंघन करत आहेत. घणसोली विभाग कार्यालय येथे सर्वात जास्त सरासरी ६४ डेसिबलची नोंद झाली आहे. वाशी महानगरपालिका परिसरामध्ये गतवर्षीचे सरासरी प्रमाण ६१ डेसिबल एवढे होते. त्यामध्ये वाढ होऊन ६३ एवढे झाले आहे. वाहतुकीचे प्रमाण जास्त असलेल्या परिसरामध्ये सरासरी ६५ ते ६८ डेसिबल एवढे प्रमाण आहे. महापे पुलाजवळ सर्वात जास्त ६९, दिघा विभाग कार्यालय व रबाळे पंप हाउस येथे ६८ डेसिबल एवढी नोंद झाली आहे. सर्वात गंभीर स्थिती शांतता क्षेत्रामध्ये आहे. नेरूळ सेक्टर ७ मधील डी. वाय. पाटील विद्यापीठ परिसरामध्ये सरासरी ६२, कोपरखैरणे रा. फ. नाईक विद्यालय परिसरामध्ये ६० डेसिबल एवढी नोंद आढळून आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये शांतता क्षेत्रामध्ये आवाजाचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले असले तरी ते निकषांपेक्षा जास्त आहे. मनपा क्षेत्रामध्ये वाहनांची संख्या वाढत असून ते नियंत्रणात आणण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे.

प्रस्तावित उपाययोजना
शहरात अजून सहा ठिकाणी हवा गुणवत्ता तपासणी यंत्र बसविण्यात येणार आहे.
बेलापूर व एमआयडीसीमध्ये दोन ठिकाणी हवा गुणवत्ता तपासणी यंत्रणा बसविण्यात येणार.
एमआयडीसीमध्ये मर्क्युरी तपासणीकरिता एक केंद्र उभारण्यात येणार आहे.
पर्यावरणाविषयी माहिती नागरिकांना मिळावी यासाठी एलईडी दर्शक फलक रेल्वेस्थानक, एनएमएमटी बस थांबे व इतर ठिकाणी लावण्यात येणार आहेत.
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून राबविण्यात येणाºया उपाययोजना
राष्ट्रीय हवा गुणवत्ता तपासणी कार्यक्रमाअंतर्गत (एनएएमपी) एमपीसीबीद्वारा उभारण्यात आलेल्या नेरुळ, महापे या ठिकाणांव्यतिरिक्त महापे औद्योगिक क्षेत्र व नेरुळ सेक्टर ५० येथे सीएएक्यूएमएसची उभारणी करण्याचे प्रस्तावित केले आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने अतिरिक्त कृत्रिम मोकळी हवा तपासणी केंद्राची एमआयडीसी महापे येथे १२ प्रदूषकांचे मोजमाप करण्याकरिता उभारणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ट्रान्स ठाणे क्रिक, एमआयडीसी भागातील सर्व बल्क ड्रग्ज उद्योगांना व्हीओसी अ‍ॅनालायजर दक्षता पद्धती समवेत बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एमपीसीबीच्या वतीने सर्वसमावेशक पर्यावरण प्रदूषण निर्देशांक क्षेत्रातील उद्योगांमध्ये स्रोताजवळील प्रदूषकांची तपासणी केली जाते.

महानगरपालिका करणार रस्त्यांचे सर्वेक्षण
वाहनांमुळे ध्वनिप्रदूषणामध्ये व हवेच्या प्रदूषणामध्येही वाढ होत आहे. वाहतूककोंडी झाली की वाहनधारक कर्णकर्कश हॉर्न वाजवत असतात. गतवर्षी मनपा क्षेत्रामध्ये १३८९ अपघात झाले आहेत. या सर्व कारणांमुळे महानगरपालिकेने मनपा क्षेत्रातील १०० किलोमीटर रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, प्रदूषण रोखण्यासाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी काय उपाययोजना करायच्या या विषयी अभ्यास केला जाणार आहे.
 

Web Title: The question of dust, noise pollution is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.