वास्तुविहार प्रकल्पाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह, भिंतींना गेले तडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 12:34 AM2018-12-07T00:34:24+5:302018-12-07T00:34:30+5:30

सर्वसामान्यांना परवडणारी घरे अशी जाहिरात करून सिडकोने खारघर सेक्टर १६ या ठिकाणी वास्तुविहार व सेलिब्रेशन हे दोन गृहप्रकल्प उभारले.

The question mark on the architectural status of the project, | वास्तुविहार प्रकल्पाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह, भिंतींना गेले तडे

वास्तुविहार प्रकल्पाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह, भिंतींना गेले तडे

Next

- वैभव गायकर
पनवेल : सर्वसामान्यांना परवडणारी घरे अशी जाहिरात करून सिडकोने खारघर सेक्टर १६ या ठिकाणी वास्तुविहार व सेलिब्रेशन हे दोन गृहप्रकल्प उभारले. २00९ साली ग्राहकांना या घरांचा ताबादेखील देण्यात आला. मात्र, अवघी दहा वर्षे पूर्ण होण्याच्या कालावधीतच येथील घरांची पडझड सुरू झाली आहे. अधूनमधून या गृहप्रकल्पात प्लॅस्टर, स्लॅब कोसळण्याच्या घटना घडण्यात वाढ झाल्याने या गृहप्रकल्पाच्या बांधकाम दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
२00९ साली या गृहप्रकल्पाचा ताबा रहिवाशांना देण्यात आला. या गृहप्रकल्पात वास्तुविहार प्रकल्पातील केएच १ मध्ये ६१४ , केएच २ मध्ये ५१२, सेलिब्रेशन केएच ३ मध्ये ४७६, सेलिब्रेशन केएच ४ मध्ये ५३२ अशी एकूण २१४४ घरे आहेत. मात्र, अवघ्या नऊ वर्षांच्या कालावधीतच या इमारतीची दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, घरे खरेदी करणाऱ्यांमध्ये अल्प उत्पन्न व नोकरदारवर्गाचा सहभाग आहे. स्वत:चे घर खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. याकरिता प्रत्येक जण धडपड करीत असतो. मात्र, घर खरेदी केल्यानंतर अवघ्या काही वर्षांतच घरांची दुरवस्था होत असेल तर दोष कोणाला द्यायचा? असा प्रश्न येथील रहिवासी उपस्थित करीत आहेत.
विशेष म्हणजे, सिडकोने उभारलेल्या खारघर शहरातील घरकुल, कळंबोली, खांदा वसाहतीमधील हजारो घरे धोकादायक असल्याचे खुद्द सिडकोने जाहीर केले आहे. या गृहप्रकल्पाचा पुनर्बांधणीचा प्रश्न अद्याप प्रलंबित असताना वास्तुविहार गृहप्रकल्पातील समस्यांमुळे येथील रहिवाशांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सध्याच्या घडीला या ठिकाणी वास्तुविहार, सेलिब्रेशन प्रकल्पात पाण्याच्या टाकीला गळती, प्लॅस्टर, स्लॅब कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात .
नऊ वर्षांतच ही समस्या उद्भवली असेल तर भविष्याचे काय? ही चिंता येथील रहिवाशांना सतावत आहे. वास्तुविहार व सेलिब्रेशन प्रकल्पाच्या दुरवस्थेसंदर्भात स्थानिक नगरसेविका संजना कदम यांनी मागील दोन वर्षांपासून सिडको प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला आहे.
२०१० पासून आम्ही या ठिकाणी वास्तव्यास आहोत. या प्रकल्पात अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. पहिल्या वर्षापासून पाणीगळतीच्या समस्येला आम्हाला सामोरे जावे लागत आहे.
- दत्तात्रेय पाटील,
रहिवासी, वास्तुविहार
या गृहप्रकल्पातील समस्यांची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली जाईल.
- प्रिया रातंबे,
जनसंपर्क अधिकारी, सिडको

Web Title: The question mark on the architectural status of the project,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.