उड्डाणपुलांच्या सुरक्षेचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:20 AM2019-01-29T00:20:29+5:302019-01-29T00:20:49+5:30

न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली; पनवेल महापालिकेकडून ठोस धोरण निश्चितीची गरज

The question of the safety of the flyovers | उड्डाणपुलांच्या सुरक्षेचा प्रश्न

उड्डाणपुलांच्या सुरक्षेचा प्रश्न

Next

- वैभव गायकर

पनवेल : पनवेल शहरासह पालिका हद्दीतील उड्डाणपूल सध्या अति क्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. बहुतांश उड्डाणपुलाखाली अनधिकृत भंगारवाले, बेकायदा वाहनतळ तसेच अनधिकृत गॅरजेवाल्यांनी दुकाने थाटल्याचे पहायला मिळत आहे. उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असताना देखील अशाप्रकारे नियमांची पायमल्ली सुरू असून त्यामुळे उड्डाणपुलाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

खारघर, कामोठे, खांदा वसाहत, पनवेल, नवीन पनवेल, नावडे फाटा या सर्वच ठिकाणी अनधिकृत दुकानांनी उड्डाणपुलाखाली ठाण मांडले आहे. भंगारवाले, झोपड्या, बेकायदा वाहनतळ आदींसाठी पुलांचा आधार घेतला जात आहे. उड्डाणपुलाखालील परिसर सुशोभित करण्यासाठी मध्यंतरी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. मात्र पनवेल महापालिकेकडून कोणतेही ठोस धोरण ठरवण्यात आलेले नाही. वाहतूक पोलीसही इतर प्राधिकरणाकडे बोट दाखवत असल्याने हा विषय ज्वलंत होत आहे.

सिडको, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींच्या अखत्यारीत हे उड्डाणपूल येतात. सर्वच उड्डाणपुलाच्या खाली उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन करणारे सूचना फलक लावण्यात आले आहेत. मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई होत नाही, हेही खरे आहे.

उड्डाणपुलाखाली अनधिकृत झोपड्या, भंगाराचे गोदाम, गॅरेज सुरू असून वीजपुरवठा देखील करण्यात आला आहे. अडगळीच्या ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे पुलालाही धोका पोहोचू शकतो. त्यामुळे सिडको, महापालिका तसेच पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या ठोस कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.


पनवेल पालिका हद्दीतील खारघर, कळंबोली, नावडे फाटा, खांदेश्वर, नवीन पनवेल उड्डाणपूल, पनवेल उन्नत उड्डाणपूल, खांदा वसाहत रेल्वे क्र ॉसिंग उड्डाणपूल आदी ठिकाणी भंगारवाले, दुकाने, गॅरेज सुरू करण्यात आले आहेत. वाहनतळासाठीही पुलाखालील जागेचा उपयोग करण्यात येत असल्याने पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.

पनवेल महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणात उड्डाणपुलाखालील परिसर सुशोभित करण्यात आला होता. यावेळी शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी याठिकाणी आकर्षक चित्रे काढून जनजागृतीपर संदेश दिले होते. याशिवाय काही पुलांखाली वृक्षारोपण करण्यात आले होते.

अनधिकृत पार्किंग आमच्या निदर्शनास आल्यास वेळोवेळी कारवाई करत असतो. यासंदर्भात पालिका तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी व प्राधिकरणाशी पत्रव्यवहार केला आहे.
- अभिजित मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
पनवेल वाहतूक शाखा

Web Title: The question of the safety of the flyovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.