शाळांच्या हस्तांतरणाचा प्रश्न गंभीर
By Admin | Published: January 3, 2017 05:53 AM2017-01-03T05:53:45+5:302017-01-03T05:53:45+5:30
पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या पालिकेत २९ महसुली गावांचा समावेश आहे. या महसुली गावात एकूण ५१ रायगड जिल्हा परिषदेच्या
वैभव गायकर, पनवेल
पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या पालिकेत २९ महसुली गावांचा समावेश आहे. या महसुली गावात एकूण ५१ रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. लवकरच या शाळा महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात येणार असून हस्तांतरणाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मात्र सद्यस्थितीत शाळांना अनेक अडचणी भेडसावत असून त्या पूर्ण होण्यात विलंब लागत असल्याने विद्यार्थी-शिक्षकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
खारघरमधील बेलपाडा गावात रायगड जिल्हा परिषदेची शाळा आहे. ही शाळा मोडकळीस आल्यामुळे ती खासगी इमारतीत भाड्याच्या जागेत भरवली जात असून शाळेचे भाडे खारघर ग्रामपंचायतीच्या वतीने भरले जात होते. मात्र खारघर ग्रामपंचायतीचा पनवेल महापालिकेत समावेश झाल्यानंतर ही शाळा भरणे बंद झाले आहे. सद्यस्थितीत ही शाळा समाजमंदिरात किंवा मंदिरात भरत आहे. जोपर्यंत जिल्हा परिषदेच्या महापालिका हद्दीतील शाळांचे हस्तांतरण पूर्ण होत नाही तोपर्यंत या शाळांची दुरुस्ती होऊ शकत नाही. याठिकाणचे वीज बिल भरण्यासही अडचणी येत आहे. या सर्वाचा परिणाम शिक्षक व विद्यार्थ्यांबरोबरच शैक्षणिक दर्जावरही पडू लागला आहे.
पनवेल महापालिका हद्दीत जिल्हा परिषदेच्या ५१ शाळांमध्ये एकूण साडेसहा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जवळजवळ २७५ शिक्षक याठिकाणी कार्यरत आहेत. बेलपाडा शाळेची झालेली दुरवस्था पाहता नुकतीच पंचायत समिती सदस्य नीलेश पाटील यांनी नुकतीच गटशिक्षण अधिकारी माधुरी कुबेरकर यांची भेट घेतली. लवकरात लवकर ही शाळा सुरू करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. यावेळी दरमहिन्याला २० हजार रुपये इतके भाडे शिक्षण विभाग देऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. शाळेचा दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
५१ शाळांचे सर्वेक्षण करून सर्वप्रथम याठिकाणच्या नादुरुस्त शाळा दुरु स्त केल्या पाहिजेत, अन्यथा विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. भविष्यात जिल्हा परिषद अथवा महानगरपालिकेच्या कचाट्यात अडकून विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.