- नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने २१ कोटी रुपये खर्च करून विस्तारित भाजी मार्केट बांधले आहे. उद्घाटन करूनही आठ वर्षे मार्केटचा वापर होऊ शकला नाही. व्यापारी व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून शासनाकडून वापर बदल करण्याची परवानगी घेऊन २८५ गाळे तयार केले आहेत. बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच मार्केट पुन्हा सुरू होईल.मुंबईमधील भाजीपाला मार्केट १९९६ मध्ये तुर्भेमधील बाजार समितीच्या आवारामध्ये स्थलांतरित करण्यात आले. व्यापाऱ्यांना ९३६ गाळे उपलब्ध करून देण्यात आले. मुंबई व नवी मुंबई परिसरातील सर्व होलसेल व्यापार याच मार्केटमधून सुरू आहे. स्थलांतर झाल्यानंतरही काही व्यापाऱ्यांना गाळे उपलब्ध झाले नाहीत. याशिवाय मार्केटमध्ये नवीन परवाने घेऊन अनेकांनी बिगरगाळाधारक म्हणून व्यवसाय सुरू केला. बिगरगाळाधारकांची संख्या जवळपास ३०० पर्यंत गेल्यानंतर त्यांच्यासाठी मूळ मार्केटमधील जागा अपुरी पडू लागली.व्यापाराचा प्रश्न सोडविण्यासाठी २००३ मध्ये विस्तारित मार्केट बांधण्याची मागणी व्यापाºयांनी केली. या पाठपुराव्याला यश आले व तत्कालीन संचालक मंडळाने ११२३० चौरस मीटरच्या भूखंडावर नवीन मार्केट उभारण्याचा निर्णय घेतला. ३०० चौरस फूट क्षेत्रफळाचे २८५ गाळे तयार करण्याचा निर्णय घेऊन २००५ मध्ये प्रत्यक्ष बांधकाम सुरू केले. २००७ मध्ये बांधकाम पूर्ण झाले व गाळ्यांचे वितरणही करण्यात आले. विविध कारणांनी प्रत्यक्ष व्यापार सुरू होऊ शकला नाही. दोन्ही मार्केटना जोडणारा रस्ता व विविध कारणांनी हे काम रखडत होते. अखेर २ फेब्रुवारी २०११ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मार्केटचे उद्घाटन झाले.मार्केटचे उद्घाटन झाल्यानंतरही या ठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी फारसे ग्राहक येत नसल्यामुळे मार्केट पुन्हा बंद पडले. जवळपास आठ वर्षांपासून येथील बहुतांश गाळे बंदच ठेवावे लागले होते. काही व्यापाºयांनी निर्यातीसाठीची पॅकिंग व इतर भाजीपाल्याची विक्री सुरू ठेवली; पण त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे गाळ्यांचा अन्य कृषी मालाच्या व्यापारासाठी वापर करता यावा, अशी परवानगी व्यापाºयांनी शासनाकडे मागितली. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी या विषयी दोन वेळा लक्ष्यवेधी मांडल्यानंतर शासनाने गाळे बंदिस्त करून नियमन नसलेल्या कृषी मालाचा व्यापार करण्यास परवानगी दिली. १४ आॅगस्ट २०१७ ला बांधकाम परवानगी घेऊन गाळे बंदिस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले. एका वर्षात बांधकाम पूर्ण झाले असून भोगवटा प्रमाणपत्र मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कृषी उत्पन्न व्यापारी वेल्फेअर असोसिएशनने एकत्र येऊन येथे कृषी होलसेल मार्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच प्रत्यक्षात मार्केट सुरू होणार आहे.विस्तारित मार्केटचा प्रवास पुढीलप्रमाणे२००३ - विस्तारित भाजी मार्केटचे बांधकाम करण्याचा एपीएमसीचा निर्णय२००५ - विस्तारित भाजी मार्केटमध्ये २८५ गाळ्यांचे बांधकाम करण्याचे काम सुरू२००८ - मार्केटचे बांधकाम पूर्ण होऊन गाळ्यांचे वितरण२०११ - तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मार्केटचे उद्घाटनआॅगस्ट २०१८ - मार्केटमध्ये गाळे बंदिस्त करण्याचे काम सुरूआॅगस्ट २०१९ - मार्केटमधील गाळे बंदिस्त करण्याचे काम पूर्णएपीएमसीने बांधकाम केलेल्या मार्केटचा आठ वर्षांपासून योग्य वापर होत नव्हता. व्यापाºयांनी हा प्रश्न निदर्शनास आणून दिल्यानंतर शासनाकडे पाठपुरावा करून वापरामध्ये बदल करण्याचा व गाळ्यांचे बांधकाम करण्यासाठीच्या परवानग्या मिळवून दिल्या. रखडलेला हा प्रश्न मार्गी लावता आला याचे समाधान आहे.- मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूरविस्तारित भाजी मार्केटच्या वापरामध्ये बदल करण्यास शासनाने परवानगी दिल्यानंतर एक वर्षापूर्वी गाळे बंदिस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले. गाळ्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच मार्केट सुरू करण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.- रामदास चासकर,सचिव,कृषी उत्पन्न व्यापारी वेल्फेअर असोसिएशनमार्केटमध्ये नियमन नसलेल्या कृषी मालाचा व्यापार करण्याची परवानगी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले होते. बाजार समिती प्रशासक सतीश सोनी, सचिव अनिल चव्हाण व बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाने वापर बदल करण्यास मंजुरी दिली. बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच मार्केट पुन्हा सुरू होईल.- राहुल पवार,कायदेविषयी सल्लागार,व्यापारी वेल्फेअर असोसिएशन
भाजी मार्केटचा प्रश्न अखेर मार्गी, एपीएमसीमधील २८५ गाळ्यांचे बांधकाम पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 3:03 AM