नवी मुंबईतील सर्व्हिस सेंटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्याबाबत प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 01:44 AM2020-11-16T01:44:13+5:302020-11-16T01:44:19+5:30
अधिकारी सुस्त : जलवाहिन्यांमधून चोरले जाते आहे पाणी
n सूर्यकांत वाघमारे
n लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शहरात मोठ्या प्रमाणात गॅरेज व सर्व्हिस सेंटर चालवले जात आहेत. त्या ठिकाणी वापरले जाणारे पाणी येते कुठून हा संशोधनाचा विषय बनला आहे. बहुतांश सेंटरमध्ये जलवाहिनीच्या चोरीच्या पाण्याचा वापर होत असल्याने सर्वच ठिकाणांची पाहणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरात प्रत्येक नोडमध्ये मोठ्या संख्येने वाहनांचे सर्व्हिस सेंटर पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी दुचाकीसह चारचाकी वाहने धुण्याचे काम होत आहे. यासाठी शंभर ते दीडशे रुपये शुल्क आकारले जात आहे. यानुसार एका वाहनामागे शेकडो लीटर पाण्याचा वापर होत असल्याने प्रत्येक सेंटरमध्ये दिवसाला लाखो लीटर पाण्याचा वापर होत आहे.
त्यांना हे पाणी येतेय कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात चालत असलेले बहुतांश सर्व्हिस सेंटर मोरबेच्या जलवाहिन्यांच्या जळपासच्या परिसरात आहेत. त्यापैकी अनेकांकडून जलवाहिनीचे पाणी चोरले जात असल्याचा दाट संशय आहे.
तर नोडमध्ये चालणारे सेंटर चालकांनी जवळपासच्या जलवाहिनीला पाइप जोडून सेंटरपर्यंत पाणी वाहून नेल्याचीही शक्यता आहे.
अनेक सेंटरच्या समोर रस्ते खोदून हे नळ जोडण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी टाक्या उभारून त्यात टँकरद्वारे पाणी साठवले जात असल्याचेही भासवले जात आहे. मात्र उघडपणे हे सर्व्हिस सेंटर चालवले जात असतानाही प्रशासनाकडून तिथली झाडाझडती का घेतली जात नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे.
धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज
वाहने धुतल्यानंतरचे सांडपाणी हे जवळपासच्या नाल्यात व गटारात सोडले जात आहे. वाहने धुण्यासाठी डिझेलचा वापर होत असल्याने सांडपाण्यात मोठ्या प्रमाणात तेलाचे प्रमाण असते. नाल्याद्वारे हेच सांडपाणी नाल्यांमधून खाडीत मिसळत आहे. यामुळेच अनेक ठिकाणी पाण्यावर तेलाचे तवंग दिसून मासे मरत असल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे शहरातील सर्व्हिस सेंटरच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.