महाड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील सर्वधर्मसमभाव सतत जागृत राहण्यासाठी आणि दंगामुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड आणि दि ग्रेट टिपू सुलतान ब्रिगेडच्या वतीने २४ सप्टेंबर रोजी छत्रपतींची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या संकल्प मेळाव्याला महाराष्ट्रातून सुमारे ५० हजार मुस्लीम शिवभक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवविचारवंत शेख सुभानअल्ली यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हते. ते एक उत्तम प्रशासक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीकच होते. त्यामुळे शिवरायांचे विचार खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात रुजले तर सर्व जाती-धर्मामध्ये परस्पर सामंजस्य व मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होऊ शकतील. जातीय व धार्मिक दंगलीसारखे प्रकार टळून सर्वसामान्य माणसाला सर्वांगीण प्रगती साध्य करण्याची संधी मिळेल, या एकमेव उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन रायगडावर केल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले आहे. राज्य आणि देशातील सर्व जातीधर्मीयांना एकमेकांशी सलोख्याने जोडायचे असेल, त्यांच्यात सामंजस्य निर्माण करायचे असेल तर शिवरायांचेच विचार अमलात आणणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सुभानअल्ली यांनी केले आहे. २४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या मेळाव्याचे निमित्ताने प्रथमच शिवविचारांचे ५० हजार मुस्लीम बांधव किल्ले रायगडावर येत आहेत. जातीधर्मात परस्पर सामंजस्य निर्माण होण्याच्या उद्देशाने २४ सप्टेंबरला रायगडावर ५० हजार शिवभक्त उपस्थित राहणार ही बाब अभिमानास्पद आहे. मुस्लीम समाजबांधव विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडत आहेत.या मेळाव्याचे परवानगीचे पत्र संयोजकांनी २३ आॅगस्ट २०१६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती महाडच्या प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली. (वार्ताहर)
दंगामुक्त महाराष्ट्रासाठी रायगडावर संकल्प मेळावा
By admin | Published: September 17, 2016 2:22 AM