जामिनावर सुटताच पुन्हा झाली अटक, जबरी चोरीचा गुन्हा
By सूर्यकांत वाघमारे | Published: March 24, 2023 06:21 PM2023-03-24T18:21:38+5:302023-03-24T18:22:07+5:30
जामिनावर बाहेर येताच गुन्हा करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी साथीदारांसह अटक केली आहे.
नवी मुंबई: एका गुन्ह्यात जामिनावर बाहेर येताच गुन्हा करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी साथीदारांसह अटक केली आहे. त्यांनी रबाळे एमआयडीसी मधील एका कंपनीच्या भिंतीला भगदाड पाडून चोरी केली होती.
दिघा येथील केमिओ फॅब्रिक्स या कंपनीत १९ मार्चला चोरीची घटना घडली होती. कंपनीच्या भिंतीला भगदाड पाडून कंपनीतील साहित्य चोरीला गेले होते. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सुधीर पाटील यांनी उपनिरीक्षक दीपक शेळके यांचे पथक केले होते. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही व खबऱ्यांच्या माध्यमातून या गुन्ह्याचा उलगडा करून तिघांना अटक केली आहे.
त्यामध्ये एका सराईत गुन्हेगाराचा समावेश असून तीन दिवसांपूर्वीच तो पूर्वीच्या गुन्ह्यात जामिनावर कारागृहाबाहेर आला होता. सुनील कुचेकर उर्फ भोवऱ्या असे त्याचे नाव असून राहुल दुनघव व आकाश घाडगे अशी साथीदारांची नावे आहेत. सुनील हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी देखील चोरीचे गुन्हे दाखल आहेत. गट आठवडयात तो जामिनावर बाहेर आला असता तिसऱ्याच दिवशी त्याने केमिओ कंपनीत साथीदारांसह चोरी केली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केल्याने पुन्हा त्याला कोठडीची हवा खावी लागणार आहे.