नवी मुंबई : गोठीवली गाव परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणी रबाळे पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरु आहे. अटक केलेला गुन्हेगार हा बिगारी कामगार असून कामाच्या निमित्ताने परिसराची रेकी करायचा. त्याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून ८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
गोठीवली गाव परिसरात एकाच वेळी तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांनी निरीक्षक उन्मेष थिटे, सहायक निरीक्षक दीपक खरात, हवालदार निलेश भोसले, दर्शन कटके, गणेश वीर, मयूर सोनवणे, यादवराव घुले आदींचे पथक केले होते. त्यांनी घटनास्थळ परिसराची पाहणी करून व परिसरातील सीसीटीव्ही तपासून संशयित गुन्हेगाराची माहिती मिळवली होती. त्याद्वारे संशयित वर्णनाचा तरुण कोपर खैरणे सेक्टर १९ परिसरात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री त्याठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.
अधिक चौकशीत त्याचे नाव नूरआलम शेख (२५) असून तो मजुरी कामगार असल्याचे समोर आले. तर गुन्ह्यात सहभागी असलेल्या त्याच्या साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत. शेख हा मूळचा पश्चिम बंगालचा असून त्याच्यावर यापूर्वी बोरिवली, बांद्रा व विष्णूनगर येथे गुन्हे दाखल आहेत. रबाळे परिसरात देखील त्याने केलेले पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. तर त्याच्याकडे ८ लाख रुपये किमतीचे चोरीचे दागिने मिळून आले आहेत. हे दागिने घेऊन तो पश्चिम बंगालला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याच्यावर झडप टाकली. यामुळे चोरीचा मुद्देमाल मिळू शकला आहे. मिळेल ते मजुरी काम करत असताना परिसरातील बंद घरांची रेकी करून तो त्याठिकाणी घरफोडी करायचा.