नवी मुंबईतील आरोग्य केंद्रात रेबीज लसीचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 03:43 AM2018-09-25T03:43:31+5:302018-09-25T03:44:06+5:30
दिवसेंदिवस रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून श्वानदंशानंतर महापालिकेच्या वतीने विनाशुल्क रेबीज लसीकरण केले जाते.
नवी मुंबई - दिवसेंदिवस रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून श्वानदंशानंतर महापालिकेच्या वतीने विनाशुल्क रेबीज लसीकरण केले जाते. मात्र महापालिकेच्या दिघा, ऐरोली,घणसोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, नेरूळ आणि बेलापूर या आठ विभागातील प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रात लसीकरणाची सुविधा नसल्यामुळे शेकडो श्वानदंश झालेल्या रु ग्णांची गैरसोय होत आहे.
एप्रिल २०१७- ते मार्च २०१८ या अकरा महिन्यांच्या कालावधीत नवी मुंबईतून एकूण ४१६३ भटकी कुत्री पकडण्यात आली. त्यापैकी ३२२४ कुत्र्यांवर निर्बीजीकरण करण्यात आले. तर उर्वरित जखमी, चावरी आणि रोगी कुत्र्यांवर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. शहरात श्वानदंश होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. श्वानदंश झालेल्या रूग्णांवर महापालिकेच्या रूग्णालयात उपचार केले जातात. परंतु अनेक नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सद्यस्थितीमध्ये लस उपलब्ध होत नाही. महापालिकेच्या रूग्णालयाव्यतिरिक्त नागरी आरोग्य केंद्रात रेबीजची लस मिळत नसल्यामुळे श्वानदंश झालेल्या रुग्णाची परवड होत आहे. प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करण्याची मागणी घणसोली येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक दीपक दगडू पाटील यांनी महापालिका आयुक्त रामास्वामी एन.यांच्याकडे केली आहे.
सद्यस्थितीमध्ये महापालिकेच्या बेलापूर, वाशी, ऐरोली आणि नेरूळ येथील रु ग्णालयात जावून रेबीजची लस टोचून घेण्यासाठी जावे लागत आहे. यासाठी पालिकेने श्वानदंश झालेल्या रुग्णांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रात ही सुविधा उपलब्ध करावी, असे पाटील यांनी आयुक्तांना दिलेल्या लेखी तक्र ारीत म्हटले आहे.
नागरिकांचीही नाराजी
श्वानदंश झालेल्या रुग्णांवर वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. तुटवड्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण व स्थायी समितीमध्येही औषध खरेदी व आरोग्य विभागाच्या प्रत्येक कामाला तत्काळ मंजुरी दिली जाते. प्रशासनानेही दक्षता ठेवून औषधांची कमतरता भासू देवू नये अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
रेबीज लसीकरणाचा डोस एका वेळी आठ तासांच्या आत पाच रु ग्णांना द्यायचा असतो. नागरी आरोग्य केंद्रात श्वानदंश झालेले रु ग्ण कमी येत असल्यामुळे महापालिकेच्या हे रेबीज इंजेक्शनची सुविधा सर्व नागरी आरोग्य केंद्रात ठेवता येत नाही. त्यासाठी महापालिकेच्या वाशी, नेरूळ, बेलापूर आणि ऐरोली या चार रु ग्णालयात रेबीज लसीकरणाची सुविधा करण्यात आलेली आहे.
- डॉ. दयानंद कटके,
वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका