बनावट सॅनिटायझर बनविणारे रॅकेट सक्रिय, एपीएमसीमध्ये गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 04:28 AM2020-03-20T04:28:19+5:302020-03-20T04:28:45+5:30
एपीएमसी परिसरामध्ये या प्रकरणी एक जणावर गुन्हा दाखल करून साहित्य जप्त केले आहे. नेरूळमध्ये एका डॉक्टरने कोरोना प्रतिबंधक होमीओपॅथीक औषधी मिळतील अशा प्रकारचा फलक लावला असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई - कोरोनाची साथ पसरू लागल्यापासून सॅनिटायझर व मास्कची मागणी कित्येक पटीने वाढली आहे. याचाच गैरफायदा घेऊन बोगस सॅनिटायझर विक्री करणारे रॅकेटही सक्रिय होऊ लागले आहे. एपीएमसी परिसरामध्ये या प्रकरणी एक जणावर गुन्हा दाखल करून साहित्य जप्त केले आहे. नेरूळमध्ये एका डॉक्टरने कोरोना प्रतिबंधक होमीओपॅथीक औषधी मिळतील अशा प्रकारचा फलक लावला असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नवी मुंबईमध्ये आतापर्यंत कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. काही संशयित रुग्णांची तपासणीही करण्यात आली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. साथ पसरू नये यासाठी महानगरपालिकेनेही विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण शहरवासी ही साथ पसरू नये यासाठी प्रयत्न करत असताना काही जणांनी मात्र कोरोनाचा लाभ उठवून बनावट साहित्याची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांमध्ये सॅनिटायझरची मागणी कित्येक पटीने वाढली आहे. यामुळे काही जणांनी बनावट सॅनिटायझरचे उत्पादन करण्यास सुरुवात केली आहे.
ऐरोली सेक्टर ९ मधील जिशान जैदी या व्यक्तीने टीडीसी रॅक्झा व्हायरस न्युट्रलायझर नावाच्या सॅनिटायझरचे उत्पादन केले होते. यासाठी कोणत्याही कायदेशीर परवानग्या घेतल्या नव्हत्या. उत्पादन केलेल्या साहित्याची मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील ग्रोमा हाऊस इमारतीमधील प्रगती ट्रेडर्सकडे विक्री केली होती. याशिवाय देव ट्रेडर्स, ग्रोहितम बिल्डिंगमधील एका दुकानामध्येही विक्री केली होती. अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक अजय माहुले यांनी संबंधिताविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
एपीएमसी परिसरामधून पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाने टीडीसी रॅक्झा व्हायरस न्युट्रलायझर नावाच्या सॅनिटायझरच्या २०० मिलीच्या १७ व १० मिलीच्या ६ बॉटल असा एकूण ५३२० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. संबंधित व्यक्तीने अशा प्रकारचे साहित्य अजून किती जणांना विकले आहे. यामध्ये अजून कोणाचा समावेश आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत. शहरात अजून अशा प्रकारे बनावट साहित्य विक्री करत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेरूळ पश्चिमेला एक डॉक्टरने त्याच्या दुकानाच्या बाहेर कोरोना प्रतिबंधक होमीओपॅथिक औषधी मिळतील अशा प्रकारचा फलक लावला आहे. यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ लागला आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाची साथ पसरली आहे. अद्याप कोरोना प्रतिबंधक ठोस औषधे नाहीत व तशी यादीही शासनाच्या माध्यमातून घोषित केलेली नाही. असे असताना एखादा डॉक्टर प्रतिबंधक ओषधे मिळत असल्याचा दावा कसा करू शकतो, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. याप्रकरणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची, अशी मागणी होत आहे.
चौकशी करण्याची मागणी
१नेरूळमध्ये एका डॉक्टरने कोरोना प्रतिबंधक होमीओपॅथिक औषधी मिळतील असा फलक लावला आहे. अशा प्रकारे प्रतिबंधक औषधे उपलब्ध आहेत का? एखादा डॉक्टर अशा प्रकारे फलक लावून त्याची जाहिरात करू शकतात का, याविषयी महानगरपालिका व अन्न औषध प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
२याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता तेथील अधिकाऱ्यांनी याविषयी कारवाई करण्याची व चौकशी करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची असल्याचे सांगितले. अन्न व औषध प्रशासन ठाणेचे सहआयुक्त विराज पौनीकर यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला संपर्क होऊ शकला नाही.
पोलीस स्टेशन परिसरामध्ये बनावट सॅनिटायझर विकले जात आहे का, याविषयी तपासणी करत असताना टीडीसी रॅक्झा व्हायरस न्यूट्रलाझर नावाचे सॅनिटायझर निदर्शनास आले. त्यावर उत्पादनाविषयी आवश्यक माहिती छापलेली नव्हती. यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांना याविषयी माहिती दिल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
- सतीश निकम,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एपीएमसी
पोलिसांकडून शोधमोहीम
कोरोना व्हायरस पसरत असल्याच्या नावाखाली बनावट उत्पादक शहरवासीयांची फसवणूक करत आहेत. अशा ठकसेनांचा पोलिसांनीही शोध सुरू केला आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये बनावट सॅनिटायझर व इतर काही बनावट साहित्य विक्री होत आहे का, याचा तपास सुरू केला आहे. नागरिकांची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.