मुंबई एपीएमसीत सेस चोरीत कर्मचारी-अधिकाऱ्यांचे रॅकेट, दोन कर्मचाऱ्यांसह तिघा मापाडींवर कारवाई
By नारायण जाधव | Published: November 11, 2023 06:42 PM2023-11-11T18:42:41+5:302023-11-11T18:43:16+5:30
नवी मुंबई : येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये जावक गेटवर सेस चोरीवरून फळमार्केटच्या दोन कर्मचाऱ्यांसह तीन ...
नवी मुंबई : येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये जावक गेटवर सेस चोरीवरून फळमार्केटच्या दोन कर्मचाऱ्यांसह तीन मापाडी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. बाजार समितीचे सदस्य सचिव पी. एल. खंडागळे यांनी हा बडगा उगारला आहे. यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध मार्केटमध्ये सेसची चोरी करून दरवर्षी जो कोट्यवधींचा महसूल बुडविला जातो, त्यात बाजार समितीचे कर्मचारी, अधिकारी आणि सुरक्षारक्षकांचे मोठे रॅकेट असल्याचे सिद्ध झाले आहे. या रॅकेटमागे बाजार समितीचे काही अधिकारी आणि पदाधिकारी यांचा हात असल्याची चर्चा या निमित्ताने ऐन दिवाळीत होऊ लागली आहे.
हा प्रकार उघड झाल्यानंतर बाजार समितीच्या फळ मार्केटच्या २ कर्मचाऱ्यांची मुख्यालयात बदली करून ३ मापाडींवरदेखील कारवाई प्रस्तावित केली आहे. बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच सचिवांनी पदभार स्वीकारल्यानंतर अशा प्रकारची मोठी कारवाई केली आहे.
दोन दिवसांपूर्वी फळ मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून जावक गेटवरून बाजार समितीचा सेस भरून बाहेर गेलेल्या ग्राहकाच्या वाहनाला अडवले होते. मार्केटच्या उपसचिव संगीता अडांगळे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत या गाडीचा पंचनामा केला असता, गाडीत जवळपास ४ लाखांचा शेतमाल होता, मात्र ६० हजार दाखवून फक्त ६०० रुपये सेस वसूल केला होता. यावरून सचिवांनी हा कारवाईचा बडगा उगारला आहे.
दरवर्षी कोट्यवधींचे नुकसान
बाजार समितीच्या पाच मार्केटपैकी कोणत्याही मार्केटच्या विविध गेटवर कुठल्याही वाहनाची नीट तपासणी केली जात नाही. कुठल्या गाडीत कोणते धान्य आहे, कोणता सुका मेवा आहे, फळांच्या किती पेट्या आहेत. सेसच्या पावतीवर किती पेट्यांची नोंद आहे. याची शहानिशा केली जात नाही. बाजार समितीच्या चौकीमध्ये खरेदीदारांकडून जो सेस वसुली केला जात आहे, त्यामध्ये बिल बुकमध्ये कार्बन कॉपी न टाकता सेसमध्ये झोल केला जात असल्याची माहिती काही व्यापाऱ्यांनी दिली होती. फळ मार्केटमध्ये असा प्रकार सर्वाधिक आहे. कारण इतर दाणा बंदर आणि साखर-मसाला मार्केटमध्ये असेसमेंट हाेते. फळ बाजारात दररोज ५०० ते ७०० वाहनांची आवक-जावक असते. प्रत्येक वाहनातून सेसची चाेरी करून अशा प्रकारे दरवर्षी बाजार समितीचा कोट्यवधींचा महसूल बुडवला जात आहे.
दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बाजार समितीच्या विविध मार्केटमध्ये अनेक वर्षांपासून एकाही अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली नव्हती. मात्र, नव्या सचिवांनी पदभार स्वीकारताच मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे कारवाई तर केली, परंतु, या सर्व गैरकारभारांची साखळी तोडून शासनाचा महसूल लुटणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये आम्ही व्यापाऱ्यांनी ग्राहकास माल दिल्यावर ते पावत्या घेऊन रीतसर सेसचे पैसे वाहनचालकाकडे देतात. मात्र, अलीकडे मार्केटमधील काही दलाल आणि वाहनचालक, कर्मचारी यांनी आपसांत संगनमत करून एक रॅकेट तयार केले होते. यात वाहनात कमी किमतीचा माल असल्याचे भासवून त्यानुसार सेस भरून बाजार समितीच्या सेसची चोरी केली जात होती. याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर अशा लोकांवर आधी पाळत ठेवली. नंतर बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना त्यांना पकडून या रॅकेटचा पर्दाफाश केला.
- बाळासाहेब बेंडे, माजी संचालक, फळ मार्केट