नवी मुंबई : रिक्षांचे बनावट विमे काढणाऱ्या दोघांविरोधात एनआरआय पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका रिक्षाचालकाच्या रिक्षांची कागदपत्रे वाहतूक पोलिसांनी पडताळली असता, हा प्रकार उघड झाला. त्यानुसार विमा काढून देणाऱ्या दोघा एजंटविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीवूडच्या वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईची मोहीम सुरू होती. या वेळी अखिल सोमन फुलैया हा चालक परवाना नसतानाही रिक्षा चालवताना आढळून आला. यामुळे पोलिसांनी रिक्षा जप्त करून मूळ मालकाकडून रिक्षाची कागदपत्रे मागवली होती. या वेळी प्रकाश चव्हाण या रिक्षाचालकाने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये रिक्षाच्या इन्शुरन्सची मुदत संपल्याचे आढळून आले.
यामुळे सदर विम्यांचे नूतनीकरण करून आणण्यास सांगितले असता, दुसºया दिवशी चव्हाण यांनी त्याचे प्रमाणपत्र पोलिसांकडे दिले.रॉयल सुंदरम इन्शुरन्स कंपनीच्या नावाचे हे प्रमाणपत्र होते. मात्र, त्यावरील शिक्यावर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी थेट कंपनीकडून माहिती मिळवली असता, ते बनावट असल्याचे उघड झाले. या वेळी चव्हाण यांनी घणसोलीत राहणारे सुधीर गटप व अतीश गटप या एजंटकडून विमा काढल्याचे सांगितले.