नोकरीच्या बहाण्याने लुटणा-या रॅकेटचा भांडाफोड, आरोपींची सात बँक खाती गोठवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 03:46 AM2017-12-12T03:46:59+5:302017-12-12T03:47:06+5:30
नोकरीला लावण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन फसवणूक करणा-या रॅकेटचा सायबर पोलिसांनी भांडाफोड केला आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून, त्याच्या दोघा साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
नवी मुंबई : नोकरीला लावण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन फसवणूक करणा-या रॅकेटचा सायबर पोलिसांनी भांडाफोड केला आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून, त्याच्या दोघा साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. तर गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली सात बँक खाती पोलिसांनी गोठवली असून, त्यात एक कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा आहे.
नेरुळ येथील अफजीया अली खान यांनी नेरुळ पोलिसांकडे यासंबंधीची तक्रार केली होती. त्यांनी मार्च महिन्यात नोकरीसाठी विविध वेबसाइटवर त्यांचा बायोडेटा अपलोड केला होता. तीन महिन्यांनंतर त्यांना बझ डॉट इन या कंपनीकडून ई-मेलद्वारे संपर्क साधण्यात आला होता. नोकरीसाठी निवड झाल्याचे त्यांना सांगून रजिस्ट्रेशन फीच्या नावाखाली तीन हजार रुपये एका बँक खात्यात जमा करायला सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांत विविध कारणांनी त्यांच्याकडून ३ लाख ३१ हजार रुपये घेण्यात आले होते. नोकरी लागेल या आशेने त्यांनी विविध बँक खात्यात ही रक्कम भरली होती. मात्र, पैसे घेवूनही नोकरी लागत नसल्याने तसेच संबंधितांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी नेरुळ पोलिसांकडे फसवणूक झाल्याची तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी, सहायक आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अंकुश खेडकर, महिला उपनिरीक्षक वंदना घोलप, पोलीस नाईक मंगेश पाटील, शीला सांगळे यांच्या पथकाने तपासाला सुरवात केली होती.
खान यांनी ज्या बँक खात्यात रक्कम जमा केली होती व ज्या ई-मेलवरून त्यांच्याशी संपर्क साधला जात होता, ती सर्व यंत्रणा राज्याबाहेरची असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार खेडकर यांच्या पथकाने तांत्रिक तपासाद्वारे झारखंड येथून एकाला अटक केली. विकीकुमार शंकरप्रसाद नोनिया (२५) असे त्याचे नाव असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
जसविंदर सिंग व अनिलकुमार रॉय या दोन साथीदारांच्या मदतीने तो नोकरीच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक करण्याचे रॅकेट चालवत होता. यासाठी त्यांनी वापरलेल्या विविध बँकांमधील सात खात्यांची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामध्ये एक कोटीहून अधिक रक्कम जमा आहे.
शेकडो जणांना नोकरीच्या बहाण्याने गंडा घालून जमवलेली ही रक्कम आहे. त्यानुसार सायबर
पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.