नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये ओला कचरा उचलण्यावरून राडा होऊ लागला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत असल्यामुळे शासनाने आदेश काढून परवानाधारक संस्थेनेचे कचरा उचलण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता या निर्णयाची अंमलबजावणी होणार की पुन्हा राडेबाजी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजीपाला मार्केटमध्ये खराब झालेला व टाकून दिलेल्या ओल्या कचऱ्यालाही मोठी किंमत आहे. हा कचरा उचलण्याची स्पर्धा विविध गटांमध्ये सुरू असते. टाकून दिलेला भाजीपाला तबेल्यांना पुरविण्यात येतो. हे काम वेगवेगळे गट करत असून त्यांच्यामध्ये अनेकवेळा राडा झाला आहे. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेही दाखल झाले आहेत.
बाजार समितीमधील पालापाचोळा बाहेर घेवून जाण्याची परवानगी शेतकरी भाजीपाला पुरवठा सहकारी संस्था नवी मुंबई यांना देण्यात आला आहे. परंतु त्यांचा व्यतिरिक्तही अनेकजण हा पालापाचोळा उचलून घेवून जाण्याचे काम करतात. काही कचरा वेचणारे चांगला भाजीपाला वेचून त्याची बाहेर विक्रीही करतात. परवानाधारक संस्था व कचरा उचलणाऱ्या इतरांमध्ये वारंवार संघर्ष होत असल्याने संबंधीत संस्थेचे अध्यक्ष राजाराम टोके यांनी शासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या.
या तक्रारींची दखल शासनाने घेऊन ३१ ऑगस्टला आदेश काढून कचरा उचलण्याची परवानगी शेतकरी भाजीपाला पुरवठा सहकारी संस्थेची असल्याचे नमूद केले आहे. कचरा उचलणाऱ्या अन्य घटकांवर बंदी आणावी व वेळ पडल्यास संबंधीतांवर कडक कारवाई करावी अशा सूचना दिल्या आहेत. याविषयी सूचना बाजार समिती प्रशासनास दिल्या आहेत. यामुळे आता बाजार समिती प्रशासन काय भुमीका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राडा थांबणार की वाढणार
भाजीपाला मार्केटमधील ओला कचरा उचलण्याविषयी शासनाने अद्यादेश काढल्यानंतर त्याची काटेकोर अंमलबजावणी होणार की कचरा उचलण्यावरून पुन्हा राडा होणार याकडे आता बाजार समितीमधील अनेकांची लक्ष लागले आहे. याविषयी बाजार समिती प्रशासनाच्या भुमीकेकडेही लक्ष लागले आहे.