नवी मुंबई : मतदानाच्या आदल्या रात्री म्हणजेच मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून घणसोलीत दोन गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता. याबाबत तक्रारीनंतर भरारी पथक घणसोली सिम्प्लेक्स येथील गणेशकृपा सोसायटीत पोचले असता, त्यांना इमारतीखाली पडलेल्या ५०० रुपयांच्या ३४ नोटा आढळल्या. त्यानंतर बेकायदा जमाव जमवून तणाव निर्माण केल्याप्रकरणी दोन्ही गटांच्या जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला.
घणसोलीत पैसे वाटप होत असल्याची तक्रार स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्याने निवडणूक विभागाच्या भरारी पथकाला केली होती. त्यानुसार अधिकारी घटनास्थळी पोहोचले असता, इमारतीमध्ये दोन व्यक्ती वावरताना आढळल्या.
इतर ठिकाणी राहणाऱ्या या व्यक्ती एवढ्या अपरात्री येथे कशासाठी आल्या होत्या, याची चौकशी करत पथकाने त्यांची झडती घेण्यास सुरुवात केली. तेव्हा, त्यातील एकाला भीतीने भोवळ आली.
यादरम्यान अपक्ष उमेदवार विजय चौगुले आपल्या समर्थकांसह त्याठिकाणी पोहचले. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांचा जमाव होऊन वाद वाढत गेला. अखेर भरारी पथकाने तातडीने रबाळे पोलिसांची जादा कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा निर्णय घेतला.
यावेळी भरारी पथकाने इमारतीच्या मागील बाजूस पाहणी केली असता, त्याठिकाणी ५०० रुपयांच्या ३४ नोटा पडलेल्या आढळल्या. या नोटा भरारी पथकाने जप्त केल्या. तसेच, दोन्ही गटांच्या जमावाविरोधात तक्रारही दाखले केली.
तणावाचा परिणाम मतदानावर !
सुरुवातीला वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही उमेदवारांना तेथून निघून जाण्याच्या सूचना केल्या. मात्र, उमेदवार निघून गेले, तरी त्यांचे समर्थक त्या ठिकाणी थांबूनच राहिले.
साहजिकच तणाव निवळलाच नाही, उलट आणखी वाढू लागल्याचे चित्र होते. मात्र, अखेर पोलिसांच्या कडक हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. या घटनेमुळे बुधवारी मतदानाच्या दिवशीदेखील परिसरात तणावाचे वातावरण कायम होते.