नवी मुंबई : एपीएमसी मधील सेव्हन स्काय लाउंज मध्ये पहाटेपर्यंत चाललेल्या पार्टीत जबर हाणामारीची घटना घडली आहे. लाउंजच्या भागीदाराच्याच जन्मदिनाची पार्टी सुरु असताना त्यात सहभागी झालेल्यांमध्ये वाद होऊन घडला. यावेळी एकाने थेट लाउंज मालकावरच पिस्तूल रोखून त्याच्या हत्येचा प्रयत्न केला. तर पिस्तूल रोखणारी व्यक्ती एका राजकीय व्यक्तीचा भाऊ असल्याचे समजते.
एपीएमसी आवारात असलेल्या सेव्हन स्काय लाउंजमध्ये सातत्याने गुन्हेगारी कृत्ये घडत आहेत. आस्थापना चालकाकडून यापूर्वी हुक्का पार्लर चालवला जात होता. त्याठिकाणी देखील अनेकदा कारवाई झालेली असून पोलिसांना अडवून धरणे, सुरक्षा रक्षकांना मारहाण करणे असे प्रकार आस्थापनेत व तिथल्या कामगारांकडून घडले आहेत.
काही महिन्यांपासून एका शासकीय अधिकाऱ्याशी संबंधित असलेल्या जागेत स्काय सेव्हन नावाने लाउंज सुरु करून सातत्याने कायदा पायदळी तुडवला जात आहे. पहाटेपर्यंत आस्थापना सुरु ठेवून त्याठिकाणी गुन्हेगारांच्या पार्ट्या रंगत आहेत. शुक्रवारी रात्री त्याठिकाणी मोठी पार्टी रंगली होती. भागीदाराच्याच जन्मदिनाची हि पार्टी होती असे समजते. त्यामध्ये नवी मुंबईसह मुंबईतील गुन्हेगारी जगताशी संबंधित व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. पहाटे पर्यंत हि पार्टी रंगली असता शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्यात वाद झाला.
यामध्ये एका गटाने लाउंजची तोडफोड करत आस्थापना चालकावर पिस्तूल रोखून त्याच्या हत्येचा देखील प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. संपूर्ण प्रकार लाउंजमधील सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. त्याद्वारे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया एपीएमसी पोलिस ठाण्यात सुरु आहे.
सेव्हन स्काय आस्थापनेवर यापूर्वी देखील पोलिसांनी कारवाई केलेली आहे. दरम्यान त्याठिकाणी नियमबाह्य बांधकाम केल्याची देखील चर्चा आहे. यानंतरही सर्वच प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने आस्थापना चालकांकडून कायद्याची पायमल्ली होताना दिसत आहे. त्यातूनच अशा प्रकरची गुन्हेगारी कृत्ये सतत घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होत आहे.